‘रायसीना’त ‘रामनाथ’!

0

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपती निवडणुकीत उतरविण्यात आलेले राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या उमेदवार मीरा कुमार यांचा दणाणून पराभव केला. कोविंद यांना 7 लाख 2 हजार 44 मते पडली तर श्रीमती कुमार यांना 3 लाख 67 हजार 314 मते मिळालीत. कोविंद यांच्या रुपाने देशाला दुसर्‍यांदा दलित राष्ट्रपती लाभले आहेत. ते उत्तरप्रदेशातील कानपूरचे रहिवासी आहेत. कोविंद यांना सत्ताधारी भाजपसह तब्बल 40 राजकीय पक्षांचा पाठिंबा होता. तर मीरा कुमार यांना काँग्रेसह 17 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. यापूर्वी 2012 मध्ये प्रणव मुखर्जी यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार पी. ए. संगमा यांना 69 टक्के मतांनी पराभूत करून राष्ट्रपतिपदावर विजयी मोहोर उमटवली होती. तर आता 2017 मध्ये कोविंद यांनी 66 टक्के मते घेऊन मीरा कुमार यांचा पराभव केला आहे.

उत्तरप्रदेशातून पहिले राष्ट्रपती
रामनाथ कोविंद हे देशाचे चौदावे राष्ट्रपती आहेत. तर के. आर. नारायणन नंतर ते दुसरे दलित राष्ट्रपती ठरले आहेत. दोनवेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले कोविंद यांना सुमारे 40 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यात एनडीएतील सहभागी राजकीय पक्ष जनता दल (संयुक्त), बीजू जनता दल, टीआरएस, एआयडीएमके व वायएसआर काँग्रेस यांचाही समावेश होता. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, कोविंद हे उत्तर प्रदेशातून असून, या राज्याने आतापर्यंत मोदींसह नऊ पंतप्रधान आणि आता राष्ट्रपतीदेखील दिले आहेत. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, चरण सिंह, राजीव गांधी, विश्वनाथप्रताप सिंह, चंद्रशेखर आणि अटलबिहारी वाजपेयी या पंतप्रधानानंतर कोविंद यांच्या रुपाने पहिले राष्ट्रपती या राज्याला मिळाले आहेत.

मोठ्या मताधिक्याचे एनडीएचे प्रयत्न यशस्वी
एनडीएचे रामनाथ कोविंद 7 लाख 2 हजार 644 मते मिळवून विजयी झाले. तर यूपीएच्या मीरा कुमार यांना 3 लाख 67 हजार 314 मते मिळाली आहेत. कोविंद यांचा शपथविधी 25 जुलैरोजी होणार आहे. कोविंद यांची राष्ट्रपतिपदी निवड झाल्याने एनडीएत आनंदाचे वातावरण होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडूनत्यांच्या विजयाचा आनंद साजरा केला. राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारास मोठ्या मतांनी निवडूण आणण्याचे प्रयत्न अखेर यशस्वी झाले आहेत. कोविंद हे राष्ट्रपती निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा त्यांना भेटण्यासाठी 10 अकबर रोड येथील त्यांच्या तात्पुरत्या निवासस्थानी गेले होते. या दोघांनीही त्यांचे अभिनंद केले व शुभेच्छा दिल्या.

देशाचे 14 वे राष्ट्रपती
येत्या 25 तारखेला रामनाथ कोविंद हे देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ ग्रहण करतील. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथग्रहण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी संसदेचा सेंट्रल हॉल सज्ज झाला आहे. कोविंद 10 अकबर रोड याठिकाणी तात्पुरत्या वास्तव्यास आहेत. याठिकाणी आजच्या निकालानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जोपर्यंत नवे राष्ट्रपती त्यांच्या रायसीना हिल्स येथील निवासस्थानी जात नाहीत, तोपर्यंत 10 अकबर रोड येथे रामनाथ कोविंद यांच्यासाठी तात्पुरते सचिवालय असेल.

पक्षाचा दलित चेहरा
कानपूरमधील पराऊंख या मूळ गावी 1 ऑक्टोबर 1945 रोजी रामनाथ कोविंद यांचा जन्म झाला. कोविंद हे कोळी जातीचे आहेत. उत्तर प्रदेशात या जातीचा समावेश अनुसूचित जातीमध्ये होतो. वकील असलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काम केले आहे. ते 1977 ते 1979 या कालावधीत दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील होते. 1991 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर तीनच वर्षांनी म्हणजेच 1994 मध्ये त्यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. राज्यसभेवर भाजपकडून कोविंद हे दोन वेळा निवडून गेले होते. 1994 ते 2000 आणि 2000 ते 2006 हा कोविंद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ होता. पक्षाचा दलित चेहरा असलेले रामनाथ कोविंद पक्षाचे प्रवक्तेदेखील होते. 8 ऑगस्ट 2015 रोजी कोविंद यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. तसेच भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी रामनाथ कोविंद यांनी सांभाळली आहे. ते अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्षही होते.

ती 10 मते कुणाची?
महाराष्ट्र विधानसभेतील एकूण 288 पैकी 287 मतदारांनी मतदान केले. कोविंद यांना 208 मते मिळाल्याचे सांगण्यात येते. तर दोन मते अवैध ठरली आहेत. मीरा कुमार यांना 77 मते मिळाली. विधानसभेतील पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास कोविंद यांना भाजप 122, शिवसेना 63 आणि त्यात अपक्ष 13 अशी एकूण 198 मते मिळणे अपेक्षित होते. पण कोविंद यांना एकूण 208 मते मिळाली आहेत. तर मीरा कुमार यांना 77 मते मिळाली आहेत. मतांच्या आकडेवारीचा विचार केल्यास कोविंद यांना 10 मते अधिक मिळाली आहेत. आता ही 10 मते नक्की कोणती? ती मते काँग्रेसची की राष्ट्रवादी काँग्रेसची? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेचे पालन करणे हे माझे प्रमुख कर्तव्य!
राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर रामनाथ कोविंद यांनी जनतेचे आभार मानले. आपल्या भाषणात कोविंद म्हणाले, आजवर अनेक महान व्यक्तींनी देशाचे राष्ट्रपतिपद भुषवले आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद असोत किंवा अगदी एपीजे अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी असोत किंवा इतर अनेक असे नेते ज्यांनी हे राष्ट्रपतिपद भुषवून देशाची शोभा वाढवली आहे, अशा पदावर बसताना मला अभिमान वाटतो आहेच; शिवाय मोठ्या जबाबदारीची जाणीवही झाली आहे. आजचा विजय हा माझ्यासाठी भावुक क्षण आहे. समाजसेवा ही आपल्या देशाला लाभलेली एक परंपरा आहे, मी त्याच मार्गावर चालत राहणार आहे. देशाच्या सर्वोच्चपदी माझ्यासारखा व्यक्ती निवडला जाणे म्हणजे भारतीय लोकशाही किती महान आहे हे अधोरेखित करणारे सर्वात मोठे उदाहरण आहे. या पदावर बसल्यावर घटनेचे पालन करणे आणि घटनेची मर्यादा सांभाळणे हे माझे प्रमुख कर्तव्य असणार आहे. देशातल्या लोकांना नमन करून मी सगळ्या जनतेचे आभार मानतो आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला सुखी करण्यासाठी वचनबद्ध होतो आहे.
रामनाथ कोविंद, नवनियुक्त राष्ट्रपती