जळगाव। जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकेनिकल विभागातील अंतिम वर्षाचे सुयोग गिरणारे, संकेत जाखेटे, मनीष बडगुजर, दुर्वास कोपरकर, अनंत शिंदे, निरज कलंत्री या विद्यार्थ्यांनी इनोव्हेटिव पोर्टेबल सुटकेस या प्रोजेक्ट अंतर्गत कारची निर्मिती केली आहे. या कारच्या वापरामुळे हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होणार नाही व वातावरण शुद्ध करण्यास मदत होईल. तसेच या उपकरणाच्या वापरामुळे संपूर्ण इंधनाची बचत होऊन पर्यावरण प्रदूषण मुक्त करता येईल. एका वेळी एकच व्यक्ती या कारच्या सहाय्याने प्रवास करू शकतो. या कारची निर्मिती करण्यासाठी 18 हजार इतका खर्च आला आहे.
निर्मितीसाठी इलेक्ट्रिक हब मोटार, 48 होल्ट बेटरी, इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर, सुटकेस, मिनी व्हील्स आदी उपयोगी सामग्रीचा वापर करण्यात आलेला आहे. उपकरणाच्या वापरण्यासाठी इंधनविरहित चार्जिंग बेटरीचा वापर करण्यात आलेला आहे. सोलर ऊर्जावर देखील बेटरी चार्ज करता येईल. उपकरणाच्या प्रमुख विशेषतः म्हणजे या कारला अपंग व्यक्ती देखील चालवू शकतो. एकदा चार्ज केल्यानंतर 30 च्या वेगाने 25 कि.मी. अंतर पार करण्याची क्षमता आहे. सोलर प्लेटचा वापर केल्यास प्रवास सलग होऊ शकतो. 80 किलो. पर्यंत वजन असलेल्या व्यक्तीला वाहण्याची क्षमता आहे. पार्किंगची गरज नाही. प्रवास संपन्न झाल्यानंतर सुटकेस मध्ये कारची घडी करून कॅरी करू शकतात, कारण कार सहित सुटकेसचे वजन फक्त 25 किलो आहे. या कारचा लहान मोठ्या कंपन्या, विद्यापीठ व महाविद्यालयीन परिसर व लहान मोठ्या रस्यांवर वापर करू शकतो. असा आगळा वेगळा प्रयोग या विद्यार्थ्यांनी यशस्वी केला आहे.