रायसोनी महाविद्यालयातील रोजगार मेळाव्यात 112 विद्यार्थ्यांची निवड

0

जळगाव। शिक्षण घेऊन आपण फक्त पात्रता मिळवीत असतो परंतू, रोजगारासाठी पात्रतेसोबत इतर कौशल्य विकसित असणे अत्यंत महत्वाचे आहे. नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत परंतु त्यासाठी लागणारे योग्य व्यक्ती पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही. तसेच आपण घेतलेल्या शिक्षणासोबत आपल्यातील वेगळेपण काय आहे. यावर लक्ष केंद्रित करा आणि त्या पद्धतीने रोजगारासाठी मेहनत करा. त्याचप्रमाणे तुमच्या नाविन्यता शोधा, आवडीनुसार काम करा आणि नियोजनपूर्वक करा. रोजगार मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला आवश्यक त्या सुप्त गुणांना विकसित करणे महत्त्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्य, वर्तणूक, शिस्तबद्धपणा, सादरीकरण, क्षमता अशा विविध गुणांच्या उणीवा भरून काढणे म्हणजे तुमचा रोजगाराचा मार्ग खुला झाला असे म्हणता येईल. असे मत जॉन डीअर कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक अभिजीत परलीकर यांनी व्यक्त केले.

415 विद्यार्थ्यांनी दिल्या मुलाखती
रोजगार मेळाव्यात अंतिम वर्षातील डिप्लोमा, अभियांत्रिकीच्या सर्व शाखेतील विद्यार्थी, कला, विज्ञान, वाणिज्य पदवी पूर्ण झालेले विद्यार्थी, प्रत्येक शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थी, (एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए) अशा सर्वच शाखेतील 415 विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांनी एका पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्यात. असे एकूण 658 विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आयोजित रोजगार मेळाव्यात विद्यार्थ्यांनी जॉन डीअर 108, मेरिको 60, आशियन रिसर्च हाउस 72, कॅपिटल हाईट 120, बिर्ला सन लाईफ 72, ऑप्तिसोल सॉफ्टवेअर 68, कुरलॉन 48 व पाईप टेक इंजिनिअर सोल्युशन 110 या संख्येने मुलाखती पार पडल्यात. यावेळी कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, संचालिका डॉ.प्रिती अगरवाल, प्लेसमेंट डीन, विजय कपाई, आनंद कामटीकर व कंपनीतील वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक उपस्थित होते. रोजगार मेळाव्याच्या यशस्वितेसाठी प्लेसमेंट अधिकारी निलेश बाऊस्कर, पंकज पाटील, प्रा.तन्मय भाले व विद्यार्थी समन्वयक यांनी काम पहिले.