पुणे- नाशिकपाठोपाठ पुण्यातही रावण दहनावरुन वाद निर्माण झाला आहे. भीम आर्मीने पुणे पोलीस आयुक्तालयाला निवेदन दिले आहे. रावण दहनामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे पोलिसांनी रावण दहनाच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये तसेच याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘भीम आर्मीने केली आहे.
नाशिकमध्ये रावण दहनास आदिवासी बचाव अभियान व कोकणा कोकणी आदिवासी सेवा संघाने विरोध दर्शवला आहे. यापाठोपाठ आता पुण्यातही रावण दहनासविरोध सुरु झाला आहे. आदिवासी तसेच मागासवर्गीय समाजातील अनेकांसाठी रावण दैवत आहे. रावण दहनाच्या कार्यक्रमांमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात, याची जबाबदारी घेत अशा कार्यक्रमांना परवानगीच देऊ नये, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. राज्याच्या अन्य भागांमध्येही वेगवेगळ्या संघटनांनी या संदर्भातील पत्र दिल्याने रावण दहनावरुन महाराष्ट्रात वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.