राष्ट्रवादी उपाध्यक्ष अमित बच्छाव यांची टिका
पिंपरी : मेळाव्यासाठी गर्दी जमवणं काही अवघड आहे का, असा सवाल करतानाच गावात बिडी फुकत बसलेल्या कार्यकर्त्याला मुंबईला फुकट यायंच सांगा. इथे बिडी फुकण्यापेक्षा मुंबईत सिगरेट फूक! पहा हा फॉर्म्युला वापरून!, असा अजब सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिला. दानवेंचे हे वक्तव्य म्हणजे धुम्रपानाला प्रोत्साहन देणारे आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.
युवावर्गाने व्यसनांपासून दूर रहावे
बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने दरवर्षी जगात 55 लाख तर भारतात 10 लाख नागरिकांचा मृत्यू होतो आहे. देशात तंबाखू खाणार्यांचे व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. ही एक चिंतेची बाब असून भारत देशा समोरील मोठी समस्या आहे. युवावर्ग आपल्या देशाचे भविष्य आहे, युवकांनी व्यसनापासून दूर राहायलाच पाहिजे. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारामुळे दरवर्षी कित्येकजणांना आपले प्राण गमवावे लागतात. व्यसनी लोकांना योग्य उपचार व समूपदेशन देण्यासाठी शासनाकडून व्यसनमुक्तीपर मोहिमा आखल्या जात आहेत. एकीकडे शासनाकडून व्यसनमुक्तीपर विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांवर ठळकपणे कर्करोगासंबंधी सूचना केल्या जातात तर दुसरीकडे सत्ताधारी व्यक्तिंकडून वेळोवेळी अशी बेजबाबदार वक्तव्य करण्यात येणे दुर्दैवाची बाब आहे. धुम्रपान करणे हानिकारक आहे. त्याने कर्करोग होतो. भारतात तंबाखूविरोधात कायदा असताना देखिल धुम्रपाणाला प्रोत्साहन देणारे विधान केल्याप्रकरणी दानवेंवर कारवाई करण्यात यावी. ——