रावेत । येथील पवना नदी पात्रावर असणार्या संत तुकाराम पुलावर (बास्केट पूल) सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने संरक्षक जाळ्या बसवाव्यात अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. महापालिका प्रशासनाने येथे सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेतली नसल्यामुळे मागील काही महिन्यात या ठिकाणी अनेकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर काही उत्साही तरुणांना सेल्फी काढण्याच्या नादात नदी पात्रात पडून आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार घडणार्या अशा प्रकारच्या घटना पाहता; या ठिकाणी सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी संरक्षक जाळी बसविणे गरजेचे आहे. संरक्षक जाळ्या नसल्यामुळे या पुलावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परंतु, तरीही महापालिका प्रशासनाने येथे कोणतीही उपाययोजना केलेली नाही.
गैरप्रकारांवरही अंकुश नाही
या पुलावर विरंगुळा म्हणून आसपासचे नागरिक आपल्या कुटुंबासोबत फिरायला येतात. मात्र, या पुलावर अनेक प्रेमीयुगुल अश्लिल चाळे करतात. त्यांना कोणीही हटकत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस येथे गैरप्रकार वाढत आहेत. रात्रीच्या वेळी तर काही महाभाग येथे यथेच्छ मद्यपान करतात. त्यामुळे पोलिसांनी येथे गस्त वाढविणे गरजेचे आहे. परंतु पोलीस प्रशासनाने या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष केले आहे. हद्दीचे कारण पुढे करत पोलिसांकडून कारवाई होत नाही. यासंदर्भात स्थानिक लोकांसह येथील नगरसेवकांनीदेखील पोलीस प्रशासनाकडे कारवाईसाठी पाठपुरावा केला आहे. अनेकदा लेखी निवेदनेदेखील देण्यात आली. मात्र, तरीही पोलिसांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही.
रहदारीला होतो अडथळा
या पुलावर सकाळी व सायंकाळी नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे मक्याची भाजलेली कणसे, शेंगदाणे-फुटाणे, भेळ, कुल्फी अशा खाद्यपदार्थ्यांसह विविध सौंदर्य प्रसाधने व इतर वस्तू विक्रेत्यांचीदेखील गर्दी असते. विक्रेत्यांच्या हातगाड्यांमुळे पुलावरील रहदारीला अडथळा होतो. पुलावर मनोरंजनासाठी येणारे काही नागरिक तसेच प्रेमीयुगुलांच्या दुचाकींमुळे तर अनेकदा वाहतूक कोंडीही उद्भवते. तरीही पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी पुलावर विक्रेत्यांना मज्जाव केला पाहिजे, अशीही नागरिकांची मागणी आहे.
…तर आंदोलन करावे लागेल
पवना नदीवर रावेत येथे उभारण्यात आलेला संत तुकाराम पूल हा रावेत उपनगराची एक ओळख आहे. मात्र, या पुलावर अनेक गैरप्रकार चालतात. तरूण-तरुणी अश्लिल चाळे करतात. काही मद्यपी तर रात्री मद्यप्राशन करतात. त्यामुळे येथे एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी असे प्रकार करणार्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. अनेकदा नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. परंतु, पोलीस दखल घेत नाहीत. त्यामुळे आता दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र स्वरुपाचे आंदोलन करू, असा इशारा युवासेनेचे चिंचवड विधानसभेचे दीपक भोंडवे यांनी दिला आहे.