स्वतंत्र मंडईची मागणी
रावेत : येथील रूपीनगर परिसरामध्ये मंडईसाठी जागा द्यावी, अशी मागणी भाजी विक्रेते संघटनेकडून केली जात आहे. या संघटनेचे 100 हून अधिक सदस्य आहेत. रुपीनगर, त्रिवेणीनगर परिसरामध्ये लोकवस्ती भरपूर आहे. कामगार वर्ग प्रामुख्याने रहातो. याभागात मंडई नसल्याने फळविक्रेते व भाजीविक्रेते यांना रस्त्यावरच दुकाने थाटावे लागत आहे. त्यामुळे सतत वाहतूक कोंडी होत असते. रस्त्यावरच भाजीपाल्याचा कचरा पडल्याने दुर्गंधी येत असते. त्यामुळे स्वतंत्र मंडई झाल्यास वाहतूक कोंडी होणार नाही.
विक्रेता संघटनेचे अध्यक्ष काळोखे म्हणाले की, भाजी विक्रेत्यांना दुकानदारांच्या दारात भाजी विक्रीसाठी बसावे लागते. दुकानदाराला त्याबद्दल भाडे द्यावे लागते. तसेच सतत होणारी अतिक्रमण कारवाईमुळे भाजीविक्रेते वैतागले आहेत. त्यासाठी स्वतंत्र भाजी मंडई असावी अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली आहे. मात्र तरीही महापालिकेकडून त्याची दखल घेतली जात नाही. सततच्या कारवाईमुळे भाजीविक्रेते आर्थिक अडचणीत आले आहेत. तर नगरसेविका पौर्णिमा सोनवणे म्हणाल्या की, हा परिसर रेड झोन हद्दीतील असल्यामुळे नागरि सुविधा देताना विचार करावा लागतो. तरीही नाल्यावर स्लॅब टाकून किंवा खासगी जागेत मंडई उभारून हा प्रश्न सोडविण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे दिला आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा व व्यावसायिकांचा मंडईचा प्रश्न लवकरच सुटेल.