रावेत परिसरात स्वतंत्र उपकेंद्र

0

पिंपरी-चिंचवड : रावेत परिसर हा वेगाने विकसित होत असून, शहरातील सर्वात आकर्षक परिसरांपैकी एक अशी रावेतची ओळख होऊ लागली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच विजेची मागणीही वाढत चालली आहे. वाढलेल्या वीजपुरवठ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी या परिसरात महवितरण कंपनीचे स्वतंत्र उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. याकरिता सहा गुंठे जागा उपलब्ध झाली असून, लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

शहर चौफेर विस्तारतेय
पिंपरी-चिंचवड शहराचा चौफेर विस्तार होत आहे. यामध्ये मोशी, चर्‍होली व रावेत परिसरामध्ये सर्वाधिक गृहप्रकल्पांची बांधणी करण्यात आली आहे. त्याचा ताण नागरी सुविधांवर पडत आहे. यापैकी रावेत परिसरात नामांकित शिक्षण संस्था, दळणवळणाच्या सुविधा, शांत वातावरण अशा अनेक पूरक बाबी असल्याने हा परिसर बांधकाम व्यावसायिकांना आकर्षित करत आहे. तसेच जुना पुणे-मुंबई महामार्ग व कात्रज-मुंबई द्रुतगती महामार्गादरम्यान असल्याने या ठिकाणाचे भौगोलिक स्थानही पूरक आहे.

जागा महावितरणकडे हस्तांतरीत
या भागाला चिंचवड सब स्टेशनमार्फत वीजपुरवठा केला जात आहे. मात्र, या रावेत परिसरातील विजेची मागणी वाढत असल्याने, वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. नागरिकांची कायम ओरड होत असल्याने, महावितरण प्रशासनाने याठिकाणी स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता आवश्यक असलेली सहा गुंठे जागा महावितरणकडे हस्तांतरीत झाली असून, या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्यात आली असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.