रावेरकरांना शिस्त लावण्यासाठी प्रांतांसह तहसीलदार उतरल्या रस्त्यावर

0

नागरीकांना घरातच राहण्याचे केले आवाहन : संचारबंदीत पुन्हा 24 तासांची वाढ

रावेर (शालिक महाजन) : रावेरात दोन गटात रविवारी उसळलेल्या दंगलीनंतर प्रशासनाने परीस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सोमवारी 48 तासांची संचारबंदी जारी केली होती तर बुधवारी संचारबंदी शिथील झाल्यानंतर नागरीक व वाहनधारक पुन्हा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्यानंतर नागरीकांना शिस्त लावण्यासाठी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले. सुमित शिंदे, तहसीलदार उषाराणी देवगुणे हे स्वतः रस्त्यावर उतरले व त्यांनी बेशिस्त वाहनधारकांना चांगलेच शिस्तीचे धडे दिले. दरम्यान, प्रशासनाने पुन्हा रावेरात 24 तासांची संचारबंदी जाहीर केली आहे. नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रावेरकरांना प्रशासनाकडून शिस्तीचे धडे
रावेर शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर बुधवारी दुपारी 2 ते 4 वाजे पर्यंत प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या आदेशावरून संचारबंदी शिथील करण्यात आली. या आदेश्यात टू व्हीलर व फोर व्हीलर वाहतूक बंद करण्याबाबत सूचना करण्यात आल्या मात्र काही रावेरकरांनी आदेश धुडकावत जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी वाहनांचा वापर केल्यानंतर रस्त्यांवर गर्दी वाढली. यानंतर प्रांतधिकारी अजित थोरबोले, सुमित शिंदे, तहासीलदार उषाराणी देवगुणे स्वतः रस्त्यावर दंडुका घेऊन उतरले आणि रावेरकरांना शिस्तीचे धडे दिले. तब्बल दोन तास त्यांनी रस्त्यावर थांबुन संपूर्ण बेशिस्त वाहनांना लगाम लावून मास्क वापरण्याचेही धडे दिले या त्यांच्या अनोख्या कारवाईने सर्वत्र एकच चर्चा होती.

दोन तासांच्या शिथिलतेनंतर पुन्हा संचारबंदी
दोन तास जीवनाश्यक वस्तू भाजीपाला, दूध, मेडीकल, किराणा सामान खरेदी करण्यासाठी संचारबंदीत शिथीलता देण्यात आल्यानंतर नागरीकांची दुकानांवर गर्दी झाली होती. त्यानंतर दुपारी चार नंतर शहरात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली. दरम्यान, बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी स्वतः प्रांताधिकार्‍यांनी हाती दंडूका घेतल्याची चर्चा शहरवासीयांमध्ये रंगली होती.