रावेर : रावेरची दंगल जरी पूर्वनियोजित असली तरी एका तासात ती आटोक्यात आणून कमीत-कमी नुकसान शहरात झाले आहे. त्यामुळे आता पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे अॅक्शनमोडवर आले आहेत. पूर्वनियोजित दंगलीचा तळापर्यंत ते जाणार असून शहर पेटवणार्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. भारतभर जनता कर्क्यु असतांना इतक्या मोठ्या प्रमाणावर जमाव जमलाच कसा? दारुच्या खाली बाटल्यांमध्ये पेट्रोल बाँम्ब कुठे आणि किती दिवस आधी तयार करण्यात आले शिवाय दगडांचा साठा कुठून आणि केव्हा आणण्यात आला ? एकाच वेळेत शहरात इतर ठिकाणी जाळपोळ कशी काय झाली? तसेच हे सर्व कट-कारस्थान किती दिवस आधी रचण्यात आले होते ? या सर्व बाबींचा तपास आता पोलिस करीत आहेत.
पोलिसांना तपासाचे चक्र बाहेर फिरवावे लागेल
रावेर दंगलीतील खरे आरोपी आधीच दंगलीच्या दिवशी अंधाराचा फायदा घेऊन आधीच पसार झाले आहे तर उर्वरीत मंगळवारच्या शिथीलबंदीत ट्रॅक्टर तसेच अॅपेने शहराबाहेर पळाले आहेत. त्यामुळे पोलिसांना तपासाला वेग द्यावा लागणार असून शेत-शिवारांसह अन्य नातेवाईकांकडे आसरा घेणार्यांच्या मुसक्या आवळणे तितकेच गरजेचे आहे. तालुक्यातील दोधा येथून दंगलीतले सात आरोपी अटक करण्यात आली त्यामुळे आता गोपनीय विभागाची खरी कसोटी लागणार आहे.