रावेरमधील दोघांवर हद्दपारीची कारवाई

0

अवैध दारू विक्रेत्यांवर सहा गुन्हे दाखल

रावेर- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रावेर पोलिस स्टेशन हद्दीतील दोघांवर हद्दपारीच्या कारवाईसह प्रतिबंधात्मक तसेच अवैध दारू भट्टी, अवैध दारू विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. अवैधरीत्या जुगार खेळणार्‍या इसमांवर छापेे घालून एकूण दोन गुन्हे दाखल करण्यात आले तसेच 353 इसमांवर प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या. सुधाकर पंडीत लहासे व रवींद्र गौतम कासोदे (अहिरवाडी, ता.रावेर) यांना फैजपूर प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या आदेशान्वये खान्देशसह बुलढाणा व औरंगाबाद या जिल्ह्यातून सहा महिन्यांकरीत हद्दपार करण्यात आले आहेत. त्याना बर्‍हाणपूर येथील लालबाग पोलिस ठाणे हद्दीतील त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आणखी आठ ते दहा उपद्रवींवर हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2019ही निर्भयपणे व शांततेत पार पडावी व कोणीही कायद्याचा भंग करणार नाही तसेच मतदारांवर कोणीही कोणत्याही प्रकारे दबाब आणणार नाही व या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सांगितले.