जळगाव : रावेर तालुक्यात अवैध धान्य साठ्यांवर झालेल्या कारवाईनंतर येथील तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या नेतृत्वाखाली 51 रेशन दुकानांची तपासणी करून अहवाल जिल्हास्तरावर व तेथून नाशिक उपायुक्तांकडे पाठवण्यात आला होता. यानुषंगाने शहर व तालुक्यातील सुमारे 12 स्वस्त धान्य दुकानांचा परवाना रद्द होण्याची दाट शक्यता आहे. तपासणीत पथकाला अनेक त्रृटी आढळल्याचे समजते. 14 ऑगस्ट रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी रावेरमध्ये टाकलेल्या छाप्यात सुमारे 38 लाखांच्या धान्य साठ्यासह आयशर वाहन जप्त केले होते. त्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने तालुक्यातील 146 पैकी 51 रेशन दुकानांची चौकशी केली होती. पहिल्या टप्यात 23 तर दुसर्या टप्प्यात 28 रेशन दुकानांची तपासणी करण्यात आली तर अनेक दुकानांची फेर तपासणी करून त्याचा अंतीम अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर हा अहवाल नासिक उपायुक्त यांच्या समोर ठेवण्यात आला असून कारवाईकडे लक्ष लागले आहे.