रावेरमध्ये नायब तहसीलदारांचे घर फोडले

0
रावेर – घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी  नायब तहसीलदाराच्या घरात घरफोडी करत रोख रकमेसह 67 हजार 500 रूपयांचा ऐवज लांबविला. जुन्या सावदा रोडवरील जलशुध्दीकरण केंद्राजवळील कॉलनीतील रहिवासी तथा फैजपूर विभागीय दंडाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पी.सी. धनगर हे कुटूंबासह गावी गेले होते. त्यांच्या घराचे दार बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी गेट व घराच्या लोखंडी दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे कुलूप तोडून त्यातील 12 हजार 500 रूपए रोख, तसेच 20 हजार रूपए किमतीचे 100 भार वजनाचे चांदीच्या पाटल्या,  36 हजार किमतीचे कानातील सोन्याचे टोंगल असा एकूण 67 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरीस गेला. नायब तहसीलदार पी.सी. धनगर हे  17 रोजी घरी परत आल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी रावेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.नि. नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. विजू जावरे हे करीत आहे. नायब तहसीलदाराच्या घरी चोरी झाल्याने परिसरातील नागरिक धास्तावले  असून पोलिस गस्तीची मागणी होत आहे.