रावेरला सचखंडसह इतर गाड्यांना थांबा द्या अन्यथा लोकसभा निवडणुकीत धडा शिकविणार

0

रावेर येथे पत्रकार परीषदेत प्रशांत बोरकर यांचा इशारा; साडेचार वर्षात केवळ महानगरीलाच थांबा

रावेर- रावेर रेल्वे स्थानकावर विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यासाठी आम्ही 1997 पासून रेल्वे मंत्रालयापासून तर डीआरएम ऑफिसपर्यंत पत्रव्यवहार करत असून गेल्या साडेचार वर्षात केवळ महानगरी एक्सप्रेसलाच थांबा मिळाला आहे. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असून तत्कालीन खासदार हरीभाऊ जावळे विरोधात असताना दोन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळतो परंतु विद्यमान खासदार भाजपाचे असतांना एकाच एक्सप्रेस गाडीला थांबा दिल्याने रावेर तालुक्यातील प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे प्रवाशांचे समन्वयक प्रशांत बोरकर यांनी सोमवारी पत्रकार परीषदेत सांगितले. सचखंडसह अन्य गाड्यांना थांबा न दिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधींना धडा शिकवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

तर लोकप्रतिनिधींना जनताच धडा शिकवेल
कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रवाश्यांच्या समन्वयकांनतर्फे पत्रकार परीषदेचे सोमवारी आयोजन करण्यात आले. बोरकर म्हणाले की, रावेर तालुक्यातून जळगाव, भुसावळ येथे रोजगार शिक्षण आरोग्याच्या कामासाठी जाणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून पॅसेंजर वेळेवर येत नसल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. येत्या महिनाभरात प्रस्तावित एक्स्प्रेस गाड्यांना थांबा न दिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधार्‍यांनास धडा शिकवणार असल्याचे बोरकर म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत डॉ.प्रकाश पाटील, रामकृष्ण चौधरी, डी.डी.वाणीदेखील उपस्थित होते.

या गाड्यांना थांबा देण्याची मागणी
रावेर रेल्वे स्टेशनवर सचखंड एक्सप्रेस, पुणे-पटना (दानापुर) एक्सप्रेस, श्री गंगानगर-नांदेड एक्सप्रेस, नागपूर-भुसावळ सुपर फास्ट पॅसेंजर (व्हाया इटारसी, इटारसी- भुसावळ पॅसेंजरला सुरत-भुसावळ पॅसेंजरला कनेक्ट करण्याची मागणी यावेळी पत्रकार परीषदेत करण्यात आली.