रावेरसह यावल तालुक्याला पुन्हा वादळी पावसाचा तडाखा

0

केळीचे लाखोंचे नुकसान ; वृक्ष उन्मळले, घराचे पत्रेही उडाली ; वीजपुरवठा खंडित

रावेर- रावेरसह यावल तालुक्यात आठवडाभरानंतर दुसर्‍या जोरदार वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने केळीला सर्वाधिक मोठा फटका बसला आहे तर ठिकठिकाणी वृक्ष उन्मळण्यासह घरांची पत्रे उडाली तसेच वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांचे चांगलेच हाल झाले. प्रशासनाने पंचनाम्याचे काम तातडीने पार पाडून भरपाई द्यावी, अशी मागणी केळी उत्पादकांकडून होत आहे.

रावेर तालुक्यात पुन्हा केळीला फटका
रावेर-
शहरात पावसासोबत जोरदार वादळी वार्‍यामुळे पोलिस स्टेशन आवारातील मोठ्या वृक्षासह स्टेशन रोडवरील अनेक झाड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसामुळे पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, स्टेट बँक, पेट्रोल पंप परीसरासह महालक्ष्मी मंदिरासमोरील डेरेदार वृक्ष उन्मळले. अनेक ठिकाणी झाडे वीज तारांवर पडल्यामुळे तार तुटून वीजपुरवठा खंडित झाला तर विजेचे खांबही वाकले.

केळीचे सर्वाधिक नुकसान
सायंकाळी आलेल्या वादळामुळे बोरखेडा, निंबोल, तामसवाडी, रावेर परीसरात केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शरद महाजन, विश्वनाथ महाजन, उषाबाई शिंदे, भिकन खा, करीम खा, शेख सत्तार शेख, बुर्‍हान अजर खान, गोपाळ महाजन आदी केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.

पावसाने वातावरणात बदल
जून महिन्यात पहिल्यांदाच वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून रणरणत्या उन्हामुळे त्रस्त जनतेला वातावरणात बदल झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. सायंकाळी पाचच्या सुमार अचानक वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, यावल तालुक्यातील अनेक गावांमध्येही पाऊस झाल्याचे वृत्त असून पावसामुळे केळीला फटका बसल्याचे सांगण्यात आले.