मुलगा म्हटलेल्या रवींद्र पाटलांवर गंडांतर का? : रावेर लोकसभेचा पेच कायम
जळगाव – रावेर लोकसभा मतदारसंघातुन उमेदवार देण्याबाबत आघाडीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. हा पेच असतांना माजी खा. ईश्वरलाल जैन यांनी आठ दिवसापुर्वी मुलगा म्हटलेल्या रवींद्र पाटलांवर गंडांतर आणुन अचानकपणे ‘श्रीरामा’चा साक्षात्कार कसा घडला? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सुरू असलेली रस्सीखेच सुरू असतांना माजी खा. ईश्वरलाल जैन यांना काल अचानकपणे उद्योजक श्रीराम पाटील यांचा रावेरसाठी उमेदवार म्हणुन साक्षात्कार झाला. माजी खा. जैन यांनी महाआघाडीच्या बैठकीतुन पुढील कामासाठी जायचे असल्याचे निमीत्त करून काढता पाय घेतला होता. मात्र माजी खा. जैन यांचे ‘पुढील काम’ कोणते? असा प्रश्न निर्माण झाला होता. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे हेलिकॉप्टरने बीडकडे जायचे होते. हेलीपॅडवर अचानकपणे माजी खा. ईश्वरलाल जैन हे उद्योजक श्रीराम पाटील यांना सोबत घेऊन आ. जयंत पाटील यांच्यासमवेत चर्चा करून त्यांच्या उमेदवारीची शिफारस केली. जैन यांच्या या शिफारसीमुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता आणि संतापही व्यक्त केला गेला. ज्यांचा पक्षाशी संबंध नाही अशांना उमेदवारी कशी दिली जाते? केवळ पैसा हेच निकष असतील तर सर्वसामान्य कार्यकर्त्याने निवडणुकीत काम का करावे? असा प्रश्न कार्यकर्त्यांमधुन उपस्थित होऊ लागला आहे.
जैन ‘जामनेर’ वगळता इतर ठिकाणी पक्षाचे
पवार साहेबांवर निस्सीम भक्ती असणारे माजी खा. ईश्वरलाल जैन हे ‘जामनेर’ वगळता इतर ठिकाणी पक्षाचे असल्याचे जाहीरपणे सांगतात. जामनेरातील त्यांचे राजकीय सुत्र वेगळे आहे हे यावरून दिसुन येते. पवारसाहेबांवर नितांत श्रध्दा ठेवणार्या माजी खा. ईश्वरलाल जैन यांनी पवारांचेच मानसपुत्र असलेल्या जिल्हाध्यक्ष अॅड रवींद्र पाटील यांना सोडुन ‘श्रीरामा’चा साक्षात्कार घडावा यामागे काहीतरी राजकारण शिजत असल्याची चर्चा होत आहे.
जिल्हा बैठकीतील वक्तव्यावरून ‘घुमजाव’
गेल्या काही दिवसांपुर्वी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील निवडणुक तयारीबाबत राष्ट्रवादी कार्यालयात जिल्हा बैठक पार पडली होती. या बैठकीत रावेरसाठी उमेदवार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी माजी खा. ईश्वरलाल जैन यांनी ‘उमेदवार शोधण्याची गरजच काय? हा उमेदवार समोर बसलाय, रवींद्र पाटील…. माझ्या मुलासारखाच आहे, त्यालाच उमेदवारी द्या’ असे विधान केले होते. काल मात्र या विधानावरून त्यांनी ‘घुमजाव’ केल्याचे दिसुन आले आणि रवींद्र पाटलांवर गंडांतर आणण्याचा प्रयत्न झाला.
महाआघाडीच्या बैठकीत रवींद्र पाटलांसाठी एकमुखी मागणी
काल झालेल्या महाआघाडीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासमोर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अॅड. रवींद्र पाटील यांची उमेदवार म्हणुन कार्यकर्त्यांनी एकमुखी मागणी केली. कार्यकर्त्यांची मागणी असतांना ज्याचा पक्षाशी काडीमात्र संबंध नाही त्यांना उमेदवारी देणे हे राष्ट्रवादीसाठी धोक्याचे ठरू शकते.
रावेरचा पेच कायम अन् खडसेंची भिती
रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत आज देखिल निर्णय झाला नाही. दरम्यान माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या भितीमुळेच या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडुन अद्यापही उमेदवार देण्याबाबत संभ्रम असल्याची चर्चा आहे.