रावेरातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाचा मृत्यू

0

रावेर : कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या प्रौढाचा शनिवारी जळगावच्या कोविड रूग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला असून वैद्यकीय अधिकार्‍यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रावेर येथे आजवर कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता मात्र यापूर्वीच तालुक्यातील सावदा येथे दोन रूग्ण आढळून आल्यानंतर रावेर शहरात 58 वर्षाचा रुग्ण आढळून आला होता. या रुग्णावर जळगाव येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांना शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. या वृत्ताला रावेर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, मयताच्या संपर्कात आलेल्यांना आधीच क्वॉरंटाईन करण्यात आले असून आता अतिशय काळजीपूर्वक या मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.