रावेरातील जलसंधारण विभागात एसीबीच्या अधिकार्‍यांनी केली चार तास चौकशी

रावेर : शहरातील जिल्हा परीषदेच्या जलसंधारण विभागात सुमारे चार तास जळगाव एसीबीच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी येवून झालेल्या कामांची चौकशी केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली. अनेक महत्वाची माहिती संबधित कार्यालयाला विचारण्यात आल्याचे समजते.

साडेतेरा कोटींच्या कामांची होणार चौकशी
रावेर तालुक्यात 2015 ते 2018 या तीन वर्षांच्या कालावधीत 19 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत 417 कामांवर साडे तेरा कोटी रुपयांचा निधी खर्च झाला मात्र भूजल पातळी वाढलीच नाही तर ज्या गावांमध्ये ही कामे करण्यात आली होती तेथील पाणीटंचाईचा प्रश्न आजही कायम आहे त्यामुळे ही कामे निकृष्ट झाल्याची नागरीकांमध्ये ओरड आहे. या संदर्भात वेळो-वेळी ‘दैनिक जनशक्ती’ने आवाज उचलला होता. याची दखल आमदार शिरीष चौधरी यांनी घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करत एसआयटीद्वारे चौकशीची मागणी केली. दरम्यान , शुक्रवारी जळगावच्या अँटी करप्शन पथकाने येथील लघू सिंचन विभागाची सुमारे चार तास झाडाझडती घेतली तर सहा ते सात अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पथकाने दुपारी तीन वाजेपासून रात्री सात वाजेपर्यंत या कार्यालयातील कुसुंबा येथील साठवण बंधार्‍याच्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली. दरम्यान, या संदर्भात जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता कुलकर्णी म्हणाले की, जलयुक्त शिवार व साठवण बंधारे संदर्भात झालेल्या कामांची चौकशी करण्यात आली.

या विभागाने केली जलयुक्त शिवार योजनेची कामे
या योजनेंतर्गत रावेर तालुक्यातील 19 गावात नाला खोलीकरण व बांध, सिमेंट बंधारे बांधणे, जुन्या बंधार्‍यांची दुरुस्ती, साठवण बंधारा, पाझर तलाव, शेततळे, मातीचे बंधारे अशी कामे करण्यात आली. कामे झालेल्या गावांपैकी बहुतांशी गावे आदिवासी भागातील आहेत. ही कामे तालुका कृषी कार्यालय, रावेर वन विभाग(प्रादेशिक), पाल वन्यजीव विभाग, जलसंधारण विभाग, जिल्हा परीषदेतील लघू सिंचन विभागाने केलेली आहेत.