रावेरातील दंगल घडलेला भाग अशांत घोषित करण्याबाबत अपर मुख्य सचिवांकडे प्रस्ताव सादर

0

रावेर : रावेर शहरात वारंवार होणार्‍या दंगलीमुळे शहरातील काही भाग कायम अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवारी गृह विभागाचे अपर मुख्य सचिवांना सादर केला आहे. लॉकडाऊनमध्ये 22 मार्च 2020 रोजी रावेर शहरातील उसळलेल्या दंगली नंतर प्रशासन प्रचंड अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. दंगलीत झालेली नुकसान भरपाई दंगलखोरांकडून वसूल करण्याचा प्रस्ताव अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला होता तर रावेर शहरातील काही भाग कायम अशांत क्षेत्र घोषित करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्ताव सादर केला आहे.

हा अशांत घोषित करण्याबाबत प्रस्ताव
रावेर शहरातील नागझिरी भाग, रसलपूर नाका, लेंडीपूरा, कोतवाल वाडा, चावडी चौक, शिवाजी चौक, भोई वाडा, संभाजी नगर, इमामबाडा, पंचशील चौक, बंडु चौक, खाटीक वाडा, मन्यार वाडा, गांधी चौक, हातेशा मस्जिद, थडी भाग, पाराचा गणपती , महात्मा फुले चौक, आठवडे बाजार आदी क्षेत्र महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 51 पोटकलम 1 नुसार अशांत क्षेत्र म्हणून करण्याबाबत अधिसूचना राजपत्रात करण्याबाबतची आवश्यक कार्यवाही होण्याची विनंती अपर मुख्य सचिवांना जिल्हाधिकार्‍यांनी केली आहे.