रावेरातील दिड कोटींच्या शौचालय घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा
रावेरा भाजपा पदाधिकार्यांची पत्रकार परीषदेत मागणी
रावेर : राज्यस्तरावर गाजत असलेल्या रावेर पंचायत समितीतील शौचालय घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी गुरुवारी पत्रकार परीषदेत केली. याप्रसंगी भाजपा रावेर तालुकाध्यक्ष राजन लासूरकर हे उपस्थित होते .
शौचालय घोटाळा दुर्दैवी घटना
रावेर शहरातील भाजपा कार्यालयात गुरुवारी दुपारी पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले. नंदकिशोर महाजन पुढे म्हणाले की, शौचालय घोटाळा ही एक दुर्दैवी घटना आहे. रावेर तालुक्याच्या इतिहासाला काळीमा फासणारी ही घटना असून या घटनेची खूप मोठी व्याप्ती आहे. या घोटाळ्याबाबत 2020 पासून चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. यात अपात्र लाभार्थींच्या नावावरदेखील अनेकवेळा अनुदान काढण्यात आले आहे. या प्रकरणात सद्यस्थितीत दोन कंत्राटी कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, या घोटाळ्यात अजूनही कोणी व्यक्ती, अधिकारी सहभागी आहेत का ? याची चौकशी करण्याची गरज आहे .
ग्रामविकास अधिकार्यांची व्हावी चौकशी
लाभार्थींच्या यादीवर सक्षम अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी यांची स्वाक्षरी आहे शिवाय या शौचालय घोटाळ्यात ग्रामविकास अधिकारी सामील आहेत का याची देखील चौकशी करण्याची मागणी नंदकिशोर महाजन यांनी यावेळी केली. याबाबतची तक्रार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपा तालुका अध्यक्ष राजन लासूरकर यांनी सांगितले की, या घोटाळ्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल असून दोषी अधिकार्यांची देखील चौकशी होवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.