रावेर : शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या साई सिध्दी प्लास्टिक फॅक्टरीला बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शॉट सर्किटमुळे अचानक आग लागली. आगीमुळे सुमारे पाच ते सहा लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा संशय
एम.आय.डी.सी.भागात साई सिध्दी प्लास्टिक फॅक्टरी आहे. येथे जमा केलेल्या प्लास्टिकला मशनरीद्वारे गोळे तयार करून बाहेर पाठवले जातात. बुधवारी काम बंद होते तर दुपारी तीन-चार वाजेच्या दरम्यान फॅक्टरीत शॉर्ट सर्किट होवू आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. माजी नगराध्यक्ष शीतल पाटील व पंकज वाघ यांनी या घटनेची माहिती फॅक्टरी मालक आनंद शहाणे यांना दिली. नगर पालिका प्रशासन व महसूल प्रशासन यांना याबाबत माहिती कळवण्यात आली. आग विझवण्यासाठी रावेर व फैजपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले तर सुमारे दोन तासानंतर लागलेली आग आटोक्यात आली. आगीत फॅक्टरीचे पत्री शेड, प्लास्टिक तयार करण्याची मशनरी व येथे असलेले प्लास्टिक जळुन खाक झाले. या आगीमुळे सुमारे पाच ते सहा लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनेची माहिती जाणून घेऊन पालिका प्रशानसला आग आटोक्यात आणण्यासाठी सूचना केल्या.