रावेरातील विद्यार्थ्याची नाशिकमध्ये आत्महत्या

0

रावेर : नाशिक शहरातील एनडीएमव्हीपी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे लॉक डाऊनमध्ये जेवणाचे हाल होत असल्याने यातून आलेल्या नैराश्यातून रुपेश भरत पाटील (22, रा.रावेर) या विद्यार्थ्यांनी राहत्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

विद्यार्थ्याच्या आत्महत्येने हळहळ
रावेर शहरातील पाल रोडवर श्रीराम पाटील यांच्या फॅक्ट्रीमध्ये वास्तव्यास असलेल्या भरत पाटील यांची दोन्ही मुले उच्च शिक्षणासाठी नाशिक येथे राहतात. दोघाही मुलांची नावे मयूर व रुपेश पाटील असे असून ते शहरातीलच एनडीएमव्हीपी महाविद्यालयात शिक्षण घेतात तर कोरोना व्हायरसच्या शिरकावानंतर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी जिल्हाबंदी केल्यामुळे शहरात अडकून पडले आहेत. रूपेशचीदेखील अशीच अवस्था असल्याने व जेवणासाठी त्याचे हाल होत असल्याची माहिती नातेवाईकांना कळाली यानंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांची परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न केले मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हा विद्यार्थी तणावात होता. अखेर मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्याने राहत्या खोलीत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. रूपेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याच्या मूळगावी आणला जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.