रावेर : राज्यात गाजत असलेल्या रावेरातील शौचालय योजनेतील भ्रष्ट्राचार प्रकरणी रावेर पंचायत समितीच्या वरीष्ठ सहायक लेखाधिकार्यांसह एकूण सहा बुधवारी रावेर पोलिसांनी अटक केल्याने भ्रष्टाचार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे तर पोलिसांच्या रडारवर अनेक संशयीत असल्याची माहिती आहे. दरम्यान, गुरुवारी आरोपींना रावेर न्यायालयात हजर केले असता 12 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
अडीच महिन्यांपूर्वी दाखल होता गुन्हा
रावेर पंचायत समितीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गरीब कुटुंबाच्या शौचालय योजनेत तब्बल दिड कोटींवर भ्रष्ट्राचार झाला होता. या प्रकरणी रावेर पोलिसात अडीच महिन्यापूर्वी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते दोघे अद्याप पसार असतांना रावेर पोलिसांनी शौचालय योजनेचा अत्यंत तांत्रिक पध्दतीने तपास सुरू ठेवत भ्रष्ट्राचाराला जबाबदार असलल्या आरोपींच्या अटकसत्राला सुरुवात केली आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा पंचायत समितीचे वरीष्ठ सहाय्यक लेखाधिकारी लक्ष्मण दयाराम पाटील, रवींद्र रामु रायपूरे, नजीर हबीब तडवी (दोघे रा.पाडळा बु.॥), बाबूराव संपत पाटील (रा.विवरे बु.॥) यांना बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली तर त्यानंतर पाडळा येथून रुबाब नवाद तडवी, हमीद महेमूद तडवी यांना अटक करण्यात आली.
126 संशयीत पोलिसांच्या रडारवर
एकापेक्षा अनेक वेळा अनुदान लाटलेले तब्बल 126 जण पोलिसांच्या रडारवर आहेत. अनुदान वर्ग करण्यात निष्काळजीपणा करणारे पंचायत समितीच्या काही अधिकार्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री पोलिस निरीक्षक कैलास नागरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी शीतलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील वंजारी, विकारुद्दीन शेख, अमोल जाधव, सुकेश तडवी, सचिन घुगे, सुरेश मेढे, समाधान ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पंचायत समितीत शुकशुकाट
भ्रष्ट्राचार करणार्या एकाचाही पोलिस गय करणार नाहीत, आरोपींची संख्या अजुन वाढण्याची शक्यता आहे, असे तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी सांगितले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय योजनेत भ्रष्ट्राचार प्रकरणी वरीष्ठ सहायक लेखाधिकारी लक्ष्मण पाटील यांच्या अटकेनंतर गुरुवारी दिवसभर रावेर पंचायत समितीत शुकशुकाट दिसून आला.