रावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब !

रावेरात जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची पायमल्ली ; निम्मे अधिकारी मुख्यालयातून गायब

रावेर (शालिक महाजन) : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमी आपत्तीजनक परीस्थितीमुळे 24 व 25 जुलै रोजी आपत्ती व्यवस्थापन संबंधित सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना मुख्यालयी हजर राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले होते परंतु जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला रावेरात अधिकारी-कर्मचार्‍यांनी केरोची टोपली दर्शवली आहे. अनेक महत्वाच्या विभागातील अधिकार्‍यांनी आपल्या खाजगी कामांसाठी मुख्यालय सोडल्याने संताप व आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मुख्यालयांची ही अवस्था तर ग्रामपंचायत स्तरावर अंदाज न केलेलाच बरा, अशी स्थिती आहे. दोषी कर्मचार्‍यांवर जिल्हाधिकार्‍यांनी आता कठोर कारवाई करण्याची अपेक्षा आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली
शुक्रवार, 23 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता निर्देशाचे परीपत्रक काढण्यात आले आहे. दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, सद्यस्थितीत मान्सुन कालावधी सुरू आहे. राज्यात आपत्तीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारत येत नाही. अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, महापूर तसेच दरड कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी होऊन जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना होत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रमुख यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. शनिवार, 24 जुलै आणि रविवार, 25 जुलै रोजी मुख्यालयी हजर राहावे व कोणत्याही सबबीखाली मुख्यालय सोडून नये, असा स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढला असतांना शनिवारी रावेरात मात्र त्यांच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आल्याचे दिसून आले. अनेक बाबदार अधिकार्‍यांनी खाजगी कामानिमित्त मुख्यालये सोडल्याने कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.

आदेशाची पायमल्ली करून यांनी सोडले मुख्यालये
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व जबाबदार आधिकार्‍यांनी मुख्यालयी हजर राहण्याचे स्पष्ट आदेश असताना रावेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे इम्रान शेख त्यांच्या खाजगी कामानिमित्त नाशिकला निघाले तर कृषी अधिकारी एम.जी.भामरे यावलमध्ये त्यांच्या खाजगी कामानिमित्त बाहेर आहे या शिवाय जलसिंचन विभागाचे विनय कुलकर्णी मुख्यालय सोडुन लग्नाला निघाले व भूमी अभिलेख अधिकारी, जळगावात गेल्याचे सांगण्यात आले.