रावेरात एक कोटींची ब्राऊन शुगर जप्त : परप्रांतीय महिलेला अटक

जळगाव गुन्हे शाखेसह रावेर पोलिसांची संयुक्त कारवाई ः रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

भुसावळ/रावेर : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक रावेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रावेर शहरातून आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत असलेले तब्बल अर्धा किलो हेरॉईन (ब्राऊन शुगर) रावेरातून जप्त केल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रथमच मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सापळा रचून अख्तरी बानो अब्दुल रऊफ (45, रा.मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बर्‍हाणपूर) या महिलेला अटक करण्यात आली. प्रतिबंधीत हेरॉईन महिलेने सलीम खान शेर बहादुर खान (किटीयानी कॉलनी मनसौर, मध्यप्रदेश) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली असून या आरोपीच्या अटकेसाठी टीम रवाना झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.मुंढे यांनी दिली.

जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर कारवाई
जळगाव जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधीत असलेल्या हेरॉईन (ब्राऊन शुगर) जप्त करण्यात आल्याने अवैधरीत्या गांजा, ब्राऊन शुगर व हेरॉईनची वाहतूक करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता असून यातून जिल्ह्यात यापूर्वी ब्राऊन शुगरची झालेली वाहतूक तसेच खरेदी-विक्री करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर शहरातील डॉ.आंबेडकर चौकात एक महिला प्रतिबंधीत हेरॉईन (ब्राऊन शुगर) घेवून येणार असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी 10 वाजता सापळा रचण्यात आला होता. एका टॅक्सीतून संशयीत महिला अख्तरी बानो अब्दुल रऊफ (45, रा.मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बर्‍हाणपूर) उतरताच रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या समक्ष महिला कर्मचार्‍यांनी संशयीत महिलेकडील पांढर्‍या रंगाच्या कॅरीबॅगची झडती घेतली असता तिच्या ताब्यात 500.4 ग्रॅम वजनाचे हेरॉईनचे (ब्राऊन शुगर) दोन पाकिट आढळल्यानंतर महिलेला ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी महिलेकडून जप्त पदार्थाची तपासणी केल्यानंतर हा पदार्थ ब्राऊन शुगर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, फैजपूर पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, रावेर निरीक्षक कैलास नागरे, सहाय्यक निरीक्षक योगीता नारखेडे, रावेरचे सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक, रावेरचे उपनिरीक्षक विशाल सोनवणे, एएसआय युनूस शेख ईब्राहीम, हवालदार मनोहर रघुनाथ शिंदे, हवालदार सुनील पंडीत दामोदरे, हवालदार लक्ष्मण अरुण पाटील, किशोर ममराज राठोड, रणजीत अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, ईश्वर पंडीत पाटील, अभिलाषा मुरलीधर मनोरे, योगीता संजय पाचपांडे, रमेश भरत जाधव, भारत शांत्ताराम पाटील, विजु फत्तु जावरे, सुरेश आनंदा मेढे, प्रमोद सुभाष पाटील, सचिन रघुनाथ घुगे आदींच्या पथकाने केली.