रावेरात कोरोनासदृश लक्षणे असलेला प्रवासी आढळला

0

भिवंडीहून जबलपूरकडे प्रवास करताना रावेरात पकडले : अन्य एक जण पसार झाल्याने वाढली चिंता

रावेर : भिवंडी येथून जबलपूरकडे ट्रकमधून जाणार्‍या प्रवाशाला कोरोनासदृश विषाणूची लक्षणे आढळल्यानंतर त्यास रावेरात उतरवल्यानंतर रावेर ग्रामीण रुग्णालयातून अधिक तपासणीसाठी त्यास जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. दरम्यान, या प्रवाशासोबत आणखी एकाने रावेर ग्रामीण रुग्णालयाजवळून पळ काढल्याने चिंता वाढली आहे.

वाहन तपासणीत आढळला संशयीत रुग्ण
भिवंडी येथून 30 वर्षीय प्रवासी जबलपूरकडे जाणार्‍या ट्रकमध्ये बसला होता. हा ट्रक शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास येथील शासकीय विश्रामगृहाजवळ आल्यानंतर पोलिसांकडून तपासणी सुरू असताना त्यात संशयीत प्रवाशास कोरोनासदृश आजाराची लक्षणे जाणवल्यानंतर त्याच्यासह अन्य दोघांनाही खाली उतरवून रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात दोघांची तपासणी केल्यानंतर दोघांना जळगाव येथील जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले तर या प्रवाशांसोबत खाली उतरलेला एक संशयीत प्रवासी मात्र ग्रामीण रुग्णालयाजवळून पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. या ट्रकला रावेर ग्रामीण रुग्णालयाजवळ पाण्याने स्वच्छ धुण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.