रावेरात गणरायावर पुष्पवृष्टी करीत एकात्मतेचा संदेश

स्वागतार्ह पाऊल : गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांचा मुस्लीम बांधवांनी केला सत्कार

रावेर : रावेरात श्री विसर्जन मिरवणुकीत बाप्पांवर पुष्पवृष्टी करीत मुस्लीम बांधवांनी एकात्मतेचा संदेश देत गोडवा निर्माण केला. श्री विसर्जनादरम्यान मन्यारवाडा भागातील मशिदीवरून गणरायायवर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच गणेशोत्सव मंडळातील पदाधिकार्‍यांचा मुस्लीम बांधवांनी प्रसंगी सहृदय केलेला सत्कार चर्चेचा विषय ठरला. शहरातील दंगली हिंदू-मुस्लिम समाजाला घातक ठरल्याने मोठे नुकसान झाल्याचे सर्व शहर वासीयांच्या लक्षात आले आहे. त्याची पुनरावृत्ती न होता, दोन्ही समाजात मैत्रीचे संबंध दृढ व्हावेत या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न होत असल्याने रावेरकर आता विकास आणि शांततेचे प्रतीक बनून दंगलीचे डाग पुसून काढण्यासाठी सज्ज झाले आहे

मुस्लीम बांधवांनी दिला एकात्मतेचा संदेश
शहरात 22 मार्च 2020 रोजी दंगल उसळली होती. या दंगलीत सुमारे सव्वा कोटींचे नुकसान होवून 377 संशयीत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच या सर्व आरोपींकडून दंगलीत नष्ट झालेल्या मालमत्तेची नुकसान भरपाई करण्याची कारवाईदेखील सुरू करण्यात आली आहे तर दुसरीकडे अनंत चतुर्थदशीला गणरायाला भक्तीभावाने निरोप दिला जात असताना रावेरकरांनी एकात्मतेचे दर्शन घडवत विसर्जनासाठी निघालेल्या बाप्पांवर पुष्पवृष्टी करीत मुस्लिम बांधवांनी एकात्मतेचा संदेश रावेरसह संपूर्ण राज्याला दिला.

कृषक समाजाच्या बाप्पावर केली पुष्पवृष्टी
रावेर शहरातील राजे शिवाजी चौकातील कृषक समाज सार्वजनिक गणेश मंडळातील गणपती बाप्पा विसर्जणासाठी जात असतांना मण्यारवाडा मशिदीजवळ मुस्लिम बांधवांकडून मशीदीवरून पुष्पवृष्टी करण्यात आली व एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

मुस्लिम बांधवांनी केला सत्कार
यावेळी पुष्पवृष्टी करणारे मुस्लिम समाजाचे विश्वस्त मौलाना रफीक भाई मुतवल्ली, मोहम्मद अकबर शेख, इलियास शेख, हाजी गुलाम शेख, खलील शेख, मुस्ताक हुसेन शेख, शफीउद्दीन शेख शफी खान, मोहम्मद खान या मुस्लिम समाज बांधवांनी गणपती बाप्पावर पुष्पवृष्टी करीत हिंदू बांधव लक्ष्मीकांत शिंदे, राजेश शिंदे, प्रशांत दाणी, अनिल महाजन, सुभाष महाजन, भावलाल महाजन, नगरसेवक सुधीर पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपविभागीय अधिकारी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, सहा.पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, गोपनीय शाखेचे राजेंद्र करोडपती, विजय जावरे आदी पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हिंदू-मुस्लीम बांधवांतर्फे सकारात्मक प्रयत्न
21 मार्च 2020 रोजी पुकारलेल्या जनता कर्फ्यूच्या समारोपप्रसंगी दोन गटात वाद होऊन या चौकातील आवजी सिद्ध महाराज मंदिरासमोर आणि प्रार्थनास्थळासमोर दगडफेक होवून जाळपोळ झाली होती. या घटनेचे परीणाम संपूर्ण शहराला भोगावे लागले. यंदा मात्र मैत्री आणि सौहार्दचा नवा अध्याय सुरू झाला याचे भरभरून कौतुक होत आहे. .