रावेर : कत्तलीच्या उद्देशाने मोरव्हालकडून रावेरच्या दिशेने येणार्या दोन महेंद्रा पिकअप वाहने पाल पोलिसांनी अडवत 13 गुरांची सुटका केली. दोन्ही वाहनातील गुरांची जळगावच्या गो शाळेत रवानगी करण्यात आली. पाल पोलिसांना गुरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोरव्हालनजीक महेंद्रा पिकअप (एम.एच.04 जी.एफ.1860 व एम.एच. 04 जी.एफ.8767) यांना अडवल्यानंतर त्यातील 13 गुरांची सुटका करण्यात आली. शनिवारी मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई फौजदार राजेंद्र राठोड, कॉन्स्टेबल दीपक ठाकुर, कॉन्स्टेबल नरेंद्र बाविस्कर यांच्या पथकाने केली आहे. मध्यप्रदेशातुन सातत्याने मोठ्या प्रमाणावर गुरांची अवैधरीत्या वाहतूक सुरू असल्याने कारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षा प्राणीमित्रांकडून होत आहे.