रावेर- शहरात चोरट्यांचा धुमाकूळ कायम आहे. गुरुवारी रात्री पुन्हा रावेर शहरातील जयेश नगरात चोरट्यांनी घरफोडी करीत पाच हजारांच्या रकमेसह दगिने मिळून एक लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. रावेर पोलि ठाण्याच्या हद्दीत वाढत्या चोर्यांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाढत्या चोर्यांनी नागरीक भयाच्या सावटाखाली
रावेर शहरातील जयेश कॉलनीतील रहिवासी व पंचायत समितीचचे कर्मचारी शकील मुबारक तडवी यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी 45 हजार रुपये किंमतीचा व 15 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, सहा ग्रॅम वजनाची 18 हजार रुपये किंमतीची अंगठी, चार ग्रॅम वजनाचे व 12 हजार रुपये किंमतीचे कानातले दागिने, तीन ग्रॅम वजनाची व नऊ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, अन्य सहा हजार रुपये किंमतीचे किरकोळ दागिने, चांदीचे पायातील पट्टे तसेच पाच हजारांची रोकड मिळून एक लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला.
घरात कुटुंब झोपले असताना चोरी
शकील तडवी हे आई, पत्नी व मुलांसह दुसर्या रूममध्ये झोपले असताना चोरट्यांनी डाव साधला. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी शकील तडवी यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या केळीबागेजवळ येत तारेचे कुंपण ओलांडत लोखडी खिडकीचे ग्रील तोडले. या खिडकीतून केवळ लहान मुलगा जाईल, अशी जागा असताना चोरट्यांनी काम फत्ते केले. चोरीची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी कॉलनीत धाव घेतली. रावेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.