रावेरात पत्नीचा खून : आरोपीला दोन तासातच अटक
उटखेडा रस्त्यावरील सप्तश्रृंगी नगरातील धक्कादायक घटना : डोक्यात लाकडी दांडके टाकून केली विवाहितेची हत्या
रावेर : दाम्पत्यात झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर संतप्त पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी पाट मारले व त्यानंतर गळा आवळल्याने 46 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना उटखेडा रस्त्यावरील सप्तश्रृंगी नगरात गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पत्नीचा खून करून पसार झालेल्या पतीच्या अवघ्या काही वेळेत रावेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सुनीता संजय महाजन (46) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून संशयीत आरोपी व पती संजय महाजन (52) असे अटकेतील आरोपी पतीचे नाव आहे.
कौटुंबिक वादातून केली पत्नीची हत्या
आरोपी संजय महाजन हे पत्नी सुनीता, मुलगा स्वप्निल व चंदन महाजनसह उटखेडा रस्त्यावरील सप्तश्रृंगी नगरात वास्तव्यास आहे. गुरुवार, 3 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसतांना आरोपी संजय व पत्नी सुनीता यांच्या कुठल्यातरी कारणावरून शाब्दीक वाद वाढला व त्यानंतर संतापाच्या भरात आरोपी पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी पाट मारल्याने व डोक्याला घाव वर्मी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. रावेरात खून झाल्याची माहिती कळताच पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सचिन नवले, मनोहर जाधव, पोलिस कर्मचारी बिजू जावरे, राजेंद्र करोडपती, सचिन घुगे, सुनील वंजारी आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
मुलगा घरी आल्यानंतर खुनाचा उलगडा
विशेष म्हणजे पत्नीचा खुन करून संशयीत आरोपी संजय महाजन यांनी घराला कुलूप लावले व शहरातील मेडिकलवर काम करणारा मुलगा चंदन याच्याकडे घराची चावी सोपवली. मुलगा चंदन दुपारी जेवण्यासाठी घरी आल्यानंतर त्यान कुलूप उघडले असता त्यास आईचा खून झाल्याचे कळताच त्यास मोठा मानसिक आघात बसला. यानंतर रावेर पोलिसांना माहिती कळवण्यात आली तर अवघ्या दिड तासात रावेर कृषी उपन्न बाजार समितीच्या आवारातून संशयीत आरोपी असलेल्या संजय महाजन यास बेड्या ठोकण्यात आल्या.
अनेकांची घटनास्थळी धाव
मयत सुनीता महाजन यांच्या पश्चात चंदन व स्वप्निल अशी मुले तर चेतना नावाची मुलगी आहे. मयत सुनीता मोल-मजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाढा हाकलत होत्या. दरम्यान, खून झाल्याची घटना कळताच शहर उपाध्यक्ष संतोष पाटील, शिवसेना शहराध्यक्ष बंटी महाजन, प्रहारचे अविनाश महाजन यांनी भेट दिली. मुलगा स्वप्निल महाजन यांच्या फिर्यादीवरुन आरोपी संजय महाजन यांच्याविरोधात रावेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.