रावेरात भ्रष्टाचाराविरुद्ध एल्गार

0

रावेर। स्वातंत्र दिनी पंचायत समितीच्या कारभाराविरोधात तालुक्यातील मांगी आणि कुसुंबा खु. येथे झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी दोन वेगवेगळे उपोषण करण्यात आल्याने पंचायत समितीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गटविकास अधिकारी मात्र गंभीर नसून कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला आहे. कुसुंबा खु. येथील दलित सुधारणा योजनेंतर्गत निकृष्ट कामाची चौकशी करून संबधितांवर कारवाईच्या मागणीसाठी चांगो लहानु भालेराव हे पंचायत समिती प्रवेशद्वाराजवळ तर दुसर्‍या ठिकाणी मांगी येथे सुध्दा विविध योजनांमध्ये भ्रष्ट्राचार झाल्याने जी.एस. काझी हे तहसीलसमोर उपोषणाला बसले होते. अखेर तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या पुढाकाराने पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्‍वासनानंतर उपोषण सोडण्यात आले. ध्वजारोहणाला आलेले लोकप्रतिनिधी व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न
देशाच्या स्वातंत्र्याबद्दल मला अभिमान आहे परंतु कुसुंबा येथील कॉक्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक वेळा पंचायत समितीला कळविले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करुन संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याने स्वातंत्र्यदिनी उपोषण करावे लागले. त्यानंतरहि पंचायत समितीकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
चांगो भालेराव, उपोषकर्ता

उपोषणाचा प्रश्‍न हाटाळण्यात बीडीओंची दिरंगाई
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दोन ठिकाणी पंचायत समितीच्या कारभाराविरुध्द उपोषणास बसण्याची वेळ आली तोपर्यंत गटविकास अधिकार्‍यांनी ते रोखण्यासाठी प्रयत्न का केला नाही? दोघेही उपोषणकर्त्यांनी पंधरा दिवस अगोदर भ्रष्ट्राचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी स्वातंत्रदिनी उपोषणाला बसणार असल्याने कळविले असतांना पंचायत समिती प्रशासनाकडून याची दखल घेण्यात न आल्याने आश्‍चर्य व संताप व्यक्त होत आहे.

चौकशी करुन कारवाई करा
मांगी गावात प्रशासक बसलेले असून तेथे झालेल्या विविध योजनांमध्ये भ्रष्ट्राचार झाला आहे. यासाठी पंचायत समितीला अनेक वेळा कळविले परंतु येथील बीडीओच्या दुर्लक्षामुळे मला जळगाव जिल्हा परिषदेमध्ये तक्रार करावी लागली. तेथे सुध्दा येथील बीडीओंना कारवाई करु नये म्हणून प्रयत्न केले.
त्यामुळेच मला स्वातंत्र्यदिनी उपोषणाला बसावे लागले.
जी.एस.काझी, उपोषणकर्ता

समस्यांचे लागले ग्रहण
जिल्ह्यात सर्वाधिक समस्यांचे ग्रहण लागलेली पंचायत समिती म्हणून रावेर पंचायत समितीची ओळख होत चालली आहे. सहा महिन्यांपासून या ना त्या कारणांमुळे पंचायत समिती चर्चेत राहिली आहे. येथे कर्मचार्‍यांचे अप-डाऊन, शिक्षकांची फ्री स्टाईल, वीज चोरी, वेगवेगळ्या कामांमधील भ्रष्ट्राचार आदी विषय चर्चेत आहेत. विशेष म्हणजे पुर्वीच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दोषींना पाठीशी घालून वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला जात असून सध्याचे सीईओ या विषयांवर काय कारवाई करतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.