भुसावळात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा : बोदवडसह यावल व मुक्ताईनगरातही पोलिसांकडून शांततेचे आवाहन : सोशल मिडीयावर पोलिस प्रशासनाची करडी नजर : बाजारपेठ सुरळीत
भुसावळ : अयोध्येतील राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिल्यानंतर रावेर शहरात शांततेसह कायदा-सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी पोलिस प्रशासन व शांतता कमेटीच्या सदस्यांनी शनिवारी दुपारी शहरात रॅली काढून न्यायालयाचा निर्णय मान्य करून शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, भुसावळ शहरातील विविध भागात पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त राखला. अपर पोलिलस अधीक्षक, उपअधीक्षक यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. दरम्यान, सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी माजी नगरसेवक शेख साबीर शेख रोशन यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळात प्रार्थनास्थळासह जागोजागी कडक बंदोबस्त
भुसावळ- अयोध्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहर व बाजारपेठ हद्दीत 50 ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. शहर पोलिस ठाणे आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉईंट लावण्यात आले. शहर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात महात्मा गांधी पुतळा, हंबर्डीकर चौक, जळगाव नाका, चाळीचा परीसर, रेल्वेस्थानक परिसर, यावल नाका, गवळी वाडा, जळगावरोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग येथे गस्त ठेवण्यात आली आहे. तसेच बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत बसस्थानक, रेल्वे स्थानक परीसर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, अमरदीप टॉकीज चौक, रजा टॉवर, खडका चौफुली रोड, नाहाटा चौफुली, अष्टभुजा देवी मंदीर परिसर, बाजारपेठ परीसर, अप्सरा चौक आणि महामार्गावर 10 ठिकाणी फीक्स पॉईंट लावण्यात आले होते तर शहरातील विविध भागातील प्रार्थनास्थळाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. सोशल मिडीयावर पोलिस प्रशासनाने करडी नजर ठेवली. डीवायएसपी गजानन राठोड यांच्या नेतृत्वात निरीक्षक दिलीप भागवत व निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी बंदोबस्ताची पाहणी केली.
बाजारपेठेत व्यवहार सुरळीत
निकालाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी दहा वाजेनंतर शहरातील अनेक शाळा अर्ध्यातच सोडून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले तर शहरातील बाजारपेठेतील व्यवहार निकालाआधी व नंतरही सुरळीत सुरू होते तर बाजारपेठेतही नेहमीप्रमाणे गजबज दिसून आली. शहरातील बसस्थानकात मात्र प्रवाशांची संख्या रोडावल्याचे दिसून आले. ऐतिहासीक निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी शनिवारी दिवसभर घरीच राहणे पसंत केले.
भुसावळच्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा
भुसावळचे माजी नगरसेवक शेख साबीर शेख रोशन यांनी 4 नोव्हेंबर रोजी फेसबुकवर प्रार्थनास्थळाबाबतचा व्हिडिओ व्हायरल करून समाजास चिथावली देण्याचा प्रयत्न केल्याने गोपनीय विभागाचे कर्मचारी सचिन पोळ यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात भादंवि 505 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.
रावेर शहरात शांतता राखण्यासाठी रॅली
रावेर- शहरातील पोलिस स्थानकापासून अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत नगराध्यक्ष दारा मोहम्मद, तहसीलदार उषाराणी देवगुणे, विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, नगर पालिकेचे सीईओ रवींद्र लांडे, माजी नगराध्यक्ष हरीष गनवानी, पद्माकर महाजन, नगरसेवक प्रल्हाद महाजन, असदलुल्ला खा, सादीक मेंबर, अॅड योगेश गजरे, अॅड.आर.के.पाटील अशोक शिंदे, ज्ञानेश्वर महाजन, दिलीप कांबळे, महेमुद शेख, यूसुफ खान, दिलीप वैद्य, शकील शेख आदींसह मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम बांधव तसेच शांतता कमेटी सदस्य सहभागी झाले.
बस सेवा ठेवली बंद
राम मंदिर निकालाबाबत शनिवारी सकाळी 10.30 वाजता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मध्यप्रदेश परीवहन विभागातर्फे बससेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली परीणामी सकाळपासून रावेर (महाराष्ट्र) बर्हाणपूर (मध्यप्रदेश) बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे काहीसे हाल झाले. महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाने मात्र बसेस सुरू ठेवल्या.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक निरीक्षक नाईक, उपनिरीक्षक कदम, उपनिरीक्षक वाघमारे यांच्यासह एसआरपी प्लाटून, सीआरपीएफ प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्सच्या जवानांनी शहरात कडेकोट बंदोबस्त राखला.