रावेर । रावेर आगारात चालकांची 51, तर वाहकांची 44 पदे रिक्त आहे. याचा परिणाम उत्पन्नावर होत असून गतवर्षी आगाराला साडेतीन कोटींचा तोटा झाला. शिवाय अपूर्ण कर्मचार्यांमुळे ग्रामीण भागातील अनेक बसफेर्या रद्द होत प्रवासी संख्या घटून आगाराचे दुहेरी नुकसान झाले. मध्य प्रदेशला लागून महाराष्ट्राच्या सीमेवरील रावेर आगार कधीकाळी उत्पन्नात अग्रेसर होते. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून आगाराला घरघर लागली आहे.
ग्रामीण भागाची एसटीशी असलेली नाळ तुटली
आगारात सध्या चालकांची 181 पदे मंजूर असली तरी कार्यरत केवळ 130 आहेत. दुसरीकडे 181 वाहकांचे काम 137 कर्मचार्यांकडून करून घेतले जाते. याचा परिणाम आगाराच्या उत्पन्नावर झाला आहे. ग्रामीण भागात चांगले उत्पन्न देणार्या मार्गांवरील बसफेर्यादेखील चालक-वाहक नसल्याने बंद कराव्या लागल्या. यामुळे ग्रामीण भागाची एसटीशी असलेली नाळ तुटली. परिणामी अवैध प्रवासी वाहतुकीने डोके वर काढल्याने आगाराला गतवर्षी साडेतीन कोटींचा तोटा झाला. यंदा देखील हेच चित्र कायम राहणे शक्य आहे. याशिवाय मध्य प्रदेश परिवहन मंडळाकडून चालणार्या समांतर बसफेर्यांमुळे सर्वाधिक अडचणी रावेर आगाराला आहे. कारण या बसेस रावेर, सावदा, फैजपूर येथील प्रवासी उचलतात. यामुळे रावेर आगाराच्या जळगाव बसेसला प्रवासी मिळत नाहीत.
जुन्या, भंगार बसेसमुळे त्रास
मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या जळगावकडील बसेस रावेरमार्गे धावतात. या समांतर सवेमुळे आगाराच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होताना दिसतो. आगारात आरामदायी, निमआरामदायी बसेसची गरज आहे. मात्र, सध्या जुन्या भंगार झालेल्या बसेस रस्त्यावर धावताना दिसतात. या बसेस वेळप्रसंगी रस्त्यात नादुरुस्त होवून बंद पडतात. अशा भंगार बसेसचा कर्मचार्यांसह प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. त्यातील खिडक्यांचे पत्रे तुटले असल्यामुळे प्रवाशांना खरचटून इजा होण्याचे प्रसंग वारंवार उद्भवत असतात. आगाराच्या 75 पैकी सुमारे 40 बसेसची दयनीय अवस्था आहे. यामुळे आगाराची 126 खेड्यांची नाळ तुटत आहे. ग्रामीण भागातील या प्रवाशांना नाईलाजास्तव खाजगी वाहनांचा वापर करावा लागतो. उत्तर-पूर्वेकडील महाराष्ट्राच्या सीमेवरील शेवटचा तालुका रावेर आहे. येथून मध्य प्रदेशातील बर्हाणपूर शहर केवळ 20 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, कधी काळी प्रचंड उत्पन्न देणारे रावेर आगर आता पिछाडीवर आहे.