रावेर कडकडीत बंद, मुक्ताईनगरात ठिय्या तर यावलमध्ये प्रशासनाला निवेदन

0

गुरुवारी निंभोरीसीमला तापीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा : शुक्रवारी रावेरमध्ये ठिय्या

भुसावळ- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. मंगळवारी महाराष्ट्र बंदच्या हाकेनंतर रावेर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले तर मुक्ताईनगरात तहसीलबाहेर दिवसभर ठिय्या आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या कृतीचा निषेध करण्यात आला तर यावलमध्ये तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा समाजा आता अधिकच आक्रमक झाला असून गुरुवारी निंभोरासीम येथील तापी पात्रात जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून शुक्रवारी रावेरमध्ये ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे.

रावेर कडकडीत बंद : निंभोरासीम नदीपात्रात आंदोलनाचा इशारा
रावेर- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यानंतर रावेर शहरातील व्यापार्‍यांनी मंगळवारी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. मंगळवारी सकाळी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे योगराज महाजन, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर पाटील संभाजी बिग्रेट तालुकाध्यक्ष घनशाम पाटील, शेतकी संघ मॅनेजर विनोद चौधरी, मराठा सेवा संघाचे प्रशांत पाटील, सचिन पाटील, अ‍ॅड.लक्ष्मण शिंदे यांच्यासह असंख्य मराठा समाजबांधवांनी शहर बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर व्यापार्‍यांनी त्यास प्रतिसाद दिला. शहरातील डॉ.आंबेडकर चौक, छोरीया मार्केट, एम.जे.मार्केट, बसस्थानक परीसर, मेन रोड, बर्‍हाणपूर रोड शहरातील आदी मुख्य रस्त्यावर घोषणाबाजी करीत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली तसेच छत्रपती शिवरायांचा जयजयकार करण्यात आला. पोलिस प्रशासनातर्फे पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी शहरात कडेकोट बंदोबस्त राखला.

जलसमाधी, ठिय्या आंदोलनाचा निर्धार
मराठा समाजातर्फे आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी महत्वाची बैठक येथील मराठा मंगल कार्यलयात पार पडली. यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. सुरुवातीला स्व.काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गुरुवारी निंभोरासीम येथील तापी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन तर शुक्रवारी डॉ.आंबेडकर चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार मंगळवारच्या बैठकीत करण्यात आला. माजी आमदार अरुण पाटील, डॉ.एस.आर.पाटील, राष्ट्रवादी ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, जिल्हा सदस्य रमेश पाटील, एस.व्ही.चौधरी, राजेंद्र चौधरी, राजू ठेकेदार, ललित पाटील, तेजस पाटील, सरपंच सुनील महाजन, सीताराम महाजन, पांडुरंग चौधरी, सुनील महाजन, विलास ताठे आदी समाज बांधव उपस्थित होते.

मुक्ताईनगरात ठिय्या आंदोलन : मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुक्ताईनगर- तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे मंगळवार, 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून तहसीलदारांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दुपारी चार वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात औरंगाबाद येथील नदीपात्रात आत्मबलीदान दिलेल्या स्व.काकासाहेब शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून शोकसभा घेण्यात आली तसेच निषेध सभा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, माजी उपसभापती अनंतराव देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, मराठा सेवा संघाचे जिल्हा प्रचार प्रमुख दिनेश कदम, योगराज कंस्ट्रक्शनचे विनोद सोनवणे, साहेबराव पाटील, सुभाष बनिये, विकी मराठे, मंगेश काटे, दीपक साळुंखे, शिवराज पाटील, भूषण पाटील, जगदीश पाटील, सचिन पाटील, अविनाश बोरसे, नरेश पाटील, कल्याण पाटील, तानाजी पाटील, अनंत पंडीत, नितीन दुधे, सोपान मराठे, संदीप शिंदे, शेषराव पाटील, रामभाऊ पाटील, पवनराजे पाटील, डी.व्ही.पाटील, चंद्रकांत विटकरे, युवराज पाटील, दिलीप चोपडे, चंद्रकांत मराठे, देवानंद पाटील, संदीप पाटील, छबीलदास पाटील आदींसह सकल मराठा समाजातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते..

58 मोर्चांनी मुख्यमंत्र्यांची बगल
निषेध सभेत शांततेत निघालेल्या 58 मोर्चांना मुख्यमंत्र्यांनी बगल दिल्याची भावना व्यक्त करण्यात आली व यापुढे ठोक मोर्चाच्या माध्यमातून मोर्चांचे स्वरुप उग्र होईल, असा इशारा देण्यात आला. याची झळ प्रशासन व सर्वसामान्यांना झाल्यास याला सर्वस्वी जवाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असा गर्भित इशारा याप्रसंगी देण्यात आला.

यावलला रस्ता रोको : पोलीस प्रशासनाला निवेदन

यावल- मराठा आरक्षणााच्या मागणीवरून कायगाव, ता.गंगापूर येथील काकासाहेब शिंदे या तरूणाने जलसमाधी घेवून समाजासाठी केलेल्या बलिदानाबद्दल येथील तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली. शिंदे यांच्या कुटुंबियास एक कोटी रूपये शासनाने द्यावेत यासह परीवारातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घ्यावे या मागण्यासह अन्य पाच मागण्यांचे निवेदन महसूल कार्यालयास समाजाच्या वतीने देण्यात आले. तसेच येथील बुरूज चौकात काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षण लांबणीवर पडणे तसेच शिंदे यांच्या बलीदानास प्रशासनच कारणीभूत असल्याचे मत या प्रसंगी समाज बांधवाकडून व्यक्त करण्यात आले. शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील, संभाजी ब्रिगेडचे विजय पाटील, प्रा.संजय पाटील यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात समाजाची सद्यस्थिती कथन करून समाज गेल्या अनेक वर्षापासून शांततेने आरक्षणाची मागणी करत असल्याचे सांगून समाजाने 58 मोर्चे शांततेत काढले मात्र शासनाने त्याकडे हेतुपरस्कर दुर्लक्ष करून समाजाकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा द्यावा यासह शिंदे कुटूंबियास एक कोटी रुपये द्यावेत, परीवारातील एकास नोकरी देण्याची मागणी निवेदनात केली आहे. मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक डी.के.परदेशी व प्रभारी नायब तहसीलदार आर.डी.माळी यांना देण्यात आले. सूत्रसंचलन देवकांत पाटील यांनी केले. याप्रसंगी संतोष पाटील, सुनील गावडे, गणेश महाजन, यशवंत जासुद, नरेंद्र पाटील, दिलीप राजोरे, दिनकर क्षिरसागर, अरूण पाटील, दहिगाव उपसरपंच देविदास पाटील, वसंत पाटील, गणेश चौधरी, प्रा.संजय कदम, अतुल भोसले, मयुर पाटील, दिलीप चौधरी, यशवंत भोईटे, प्रकाश पवार, गणेश येवले, उज्वल पाटील, गौरव पाटील, पवन पाटील, योगेश माळी, राहुल भालेराव, लालचंद चौधरी, महेश पाटील, विलास पवार यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते.