रावेर ग्रामीणमध्ये ड्यूरो ऑक्सिजनसाठी जमली सुमारे पाच लाखांची लोकवर्गणी

रावेर : ग्रामीण रूग्णालयात जँम्बो ऑक्सिजन सेंटर उभारण्यासाठी लोकवर्गणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रावेर तालुक्यातील दानशुर व्यक्तींनी आतापर्यंत चार लाख 85 हजारांची वर्गणी दिली आहे. धनादेशाच्या माध्यमातुन लवकरच जँम्बो ऑक्सिजन सेंटर उभारण्यात येणार आहे.

मदतीला दानशूरांचे आवाहन
रावेर ग्रामीण रूग्णालयात कोरोनाबाधीत रुग्णांना ऑक्सिजन कमी पडत होते. येथे ड्युरो ऑक्सिजन सेंटर उभारण्यासाठी लोकवर्गणी करण्याचे आवाहन तहसील प्रशासनातर्फे करण्यात आले होते. आतापर्यंत चार लाख 85 हजार रुपये चेक व कॅश स्वरुपात जमा झाले आहे तसेच मागील वर्षी सुध्दा लोकवर्गणी जमा केलेला काही निधी शिल्लक आहे.

ही तर अनियंत्रित लाट : तहसीलदार
कोरोना संसर्गाची ही दुसरी अनियंत्रित लाट असल्याचे मत तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी व्यक्त केले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, आगामी 15 दिवस खूप कठीण आहेत. ब्रेक द चैन शासन धोरणानुसार स्वत:ही शिस्त पाळावी लागेल आणि आपल्या आसपासच्या लोकांकडूनही पालन करून घ्यावे लागेल. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि लस याद्वारेच ही लाट आपण रोखू शकतो. सद्य स्थितीत संपूर्ण प्रशासन, वैद्यकीय यंत्रणा मागील वर्षापासून खूप मेहनत घेत आहे. त्यामुळे स्वत:ला, कुटुंबाला वाचवण्यासाठी मास्क घाला, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा, खूपच आवश्यक असेल तरच घराबाहेर निघा, विनाकारण फिरू नका आणि लस आवश्य घेण्याचे आवाहन त्यांनी प्रशासना तर्फे केले आहे.