रावेर ग्रामीण रुग्णालयाच्या  कल्पना नगरे यांचा सोलापूरमध्ये सत्कार

0
करुणाशील पुरस्काराने राज्यातील 11 अधिपरीचारिका सन्मानित
रावेर (प्रतिनिधी) – समाज जीवनात वावरत असतांना अहोरात्र परिश्रम घेऊन रुग्णाचे जीव वाचवून जनमानसावर मनावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या राज्य भारतातून अकरा अधिपरीचारिका निवडून सोलापूर येथे करुणाशील बहुउद्देशीय सामाजिक संस्थे कडून त्यांचा सन्मान करण्यात आला असून यात रावेरला देखील हा बहुमान मिळाला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, सोलापूर येथील फडकुले सभागृहात पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थतीत सोलापूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुनील घाटे, ससून रुग्णालय पुणे येथील अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले, संशोधन केंद्राचे अधिष्ठाता डॉ.माधवी रायते, शुश्रूषा विभाग मुंबईच्या अधिक्षिका शोभा चाटसे, कार्यकारी अभियंता विलास मोरे, यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. यात रावेर ग्रारू च्या  कल्पना नगरे, सोलापूर येथील  सुनीता पाटील, सेंट जॅर्जेस रुग्णालयातील वैदेही मेमाणे, अकोला येथील राजश्री कोरके, लातूरच्या छाया पोतदार, राज्य कामगार विमा रुग्णालयातील  मेघा कुलकर्णी, परिचर्या शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक  डॉ.नीलिमा सोनवणे, वळसांग च्या श्रीमती कलावती चव्हाण, जे.जे. रुग्णालय भायखेळाच्या  आकांक्षा नाईक, संशोधन केंद्राचे संतोषी गोनेल यांचा भव्य स्मृती चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविकात आशुतोष नाटकर यांनी हा पुरस्कार दवाखान्यात काम करणाऱ्या आपल्या आईच्या सन्मानार्थ देण्यास सुरुवात केल्याचे म्हटले असून सुमारे सहा महिने गुणवंत व्यक्तींचा शोध घेऊन निवड करीत असल्याचे सांगितले. नगरे यांना मिळालेल्या सन्मानासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ बी.बी. बारेला, माऊली फौंडेशनचे डॉ.संदीप पाटील, श्रीराम फौंडेशन चे अध्यक्ष श्रीराम पाटील, तायक्वादो असोसिएशन चे डॉ.सुरेश महाजन यांच्यासह शहरातील डॉकटर्स मंडळी, अधिकारी वर्ग यांनी अभिनंदन केले .