रावेर । पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. सोबतच दोन दिवसांपासून फ्लॅश मिक्सरमध्ये तळावर साठलेला गाळ उपसादेखील सुरू करण्यात आला आहे. यामुळे शहरात नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करणे शक्य होईल. नगराध्यक्ष दारा मोहंमद, उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, नगरसेवक अॅड.सूरज चौधरी, असदुल्ला खान, मुन्ना अग्रवाल, गोपाळ बिरपन, मुख्याधिकारी राहुल पाटील, धोंडू वाणी यांनी भेट देऊन पाहणी केली. यापूर्वी पॅनल बोर्ड, पाण्याच्या मोटरीचे काम पूर्ण झाले आहे. आता अॅलम ब्लिचिंग युनिट पाणी शुद्धीकरणासाठी असलेल्या वाळूच्या बेडचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दिली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरात दुषीत पाणी पुरवठा होत असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात होती. त्यामुळे पालिकेने दुरुस्तीला गती दिली आहे.