रावेर (प्रतिनिधी) – जळगाव येथील शासकीय वसतीगृहातील मुबारक तडवी या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्युची सीआयडी चौकशी व्हावी, या मागणीसाठी आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचतर्फे मंगळवार 6 रोजी तहसिल कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे राज्याध्यक्ष एम.बी. तडवी, राज्य सरचिटणीस इब्राहिम तडवी, सचिव मुबारक तडवी, जिल्हाध्यक्ष जे.एम. तडवी, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज तडवी, रोहित तडवी, जिल्हा कार्याध्यक्ष नूर मोहम्मद तडवी, तालुकाध्यक्ष नसिर तडवी, तालुका उपाध्यक्ष सरफराज तडवी, तालुका सरचिटणीस अब्बाज तडवी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात आला.
अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी
यावेळी मोर्चेकर्यांतर्फे निवासी नायब तहसिलदार सी.एच. पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांमध्ये मुबारक तडवी या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्युची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, गृहपाल व संबंधितांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करावा, मुबारक तडवीचा मृतदेह दफनविधीसाठी नातेवाईकांना द्यावा, मुबारक तडवीच्या आई, वडिलांना आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांचा समावेश आहे.
यांचा होता सहभाग
या मोर्चात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उखर्डू तडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य अहमद तडवी, सुभान तडवी, कामिल तडवी, गफूर तडवी, सकिना तडवी यांसह समाजबांधव सहभागी झाले होते. फौजदार दिपक ढोमणे, हेडकॉन्स्टेबल प्रमोद चौधरी, विनोद पाटील, विठ्ठल देशमुख, मंदार पाटील व सहकार्यांनी बंदोबस्त ठेवला.