कृषी विभागात खळबळ ; शेतकर्यांना अपशब्द वापरल्याचा बसणार फटका
रावेर- शेतकर्यांशी अशोभनीय वर्तन केल्याप्रकरणी रावेर तालुका कृषी अधिकार्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याचा आदेश राज्याच्या कृषी मंत्रालयतून निघाल्याने जिल्ह्याच्या कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे. रावेर कृषी अधिकार्यांनी शेतकर्यांना अपशब्द वापरल्याने या संदर्भात ‘दैनिक जनशक्ती’ने सडेतोड वृत्त प्रसिद्ध करून मस्तवाल अधिकार्यावर कारवाईची मागणी केली होती.
शेतकर्यांना वापरले होते अपशब्द
रब्बी पेरणीसाठी रावेर कृषी विभागाकडून शेतकर्यांना 7/12 वर अनुदान तत्वावर हरभरा, गव्हाच्या बियाण्यांची परमीटे कृषी कार्यालयामार्फत वितरण केली जात होती. शेतकरी याची माहिती तालुका कृषी अधिकारी यांना विचारण्यासाठी गेले असता कृषी अधिकारी एस.एस.पवार यांनी ‘समस्या सोडायला तुमच्या बापाचा मी नोकर नाही, इथून चालते व्हा’ अशी अर्वाच्च भाषा वापरल्याने शेतकर्यांनी दोषी अधिकार्यांवर कारवाईची मागणी केली होती. या गंभीर बाबीचे वृत्त ‘दैनिक जनशक्ती’ने प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली होती. या बाबीची दखल घेत मंत्रालयातील कार्यासन अधिकारी श्री अ.ज्ञा.लांडगे यांनी पुणे येथील आयुक्त(कृषी), कृषी आयुक्तालय तर नाशिक येथील विभागीय कृषी सह संचालक यांना आदेश देऊन रावेर तालुका कृषी अधिकारी यांच्यावर तात्काळ 21 दिवसाच्या आत कार्यवाही करून तसा अहवाल कृषी मंत्रालयास कळवण्याचे आदेश दिल्याने कृषी विभागाच्या अधिकार्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. शेतकर्यांचा अपमान करणार्या मस्तवाल अधिकार्यावर कारवाई होणार असल्याने शेतकर्यांनी शासनाच्या कृतीचे स्वागत केले आहे.