रावेर तालुक्यातील लाभार्थी रेशनच्या ‘गोडव्या’पासून वंचित

पुरवठा विभागाकडून मात्र लाभार्थींना साखरेचे वाटप झाल्याचा दावा

रावेर : रावेर तालुक्यात तीन महिने उलटल्यानंतरही लाभार्थींना स्वस्त धान्य दुकानातून साखर मिळाली नसल्याने लाभार्थींमध्ये संतापाची भावना आहे तर पुरवठा विभाग निरीक्षक डी.के.पाटील यांनी रेशन दुकानातून साखर वाटप सुरू असल्याचा दावा केला जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकाराकडे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

अंत्योदय योजनेचे लाभार्थी वंचित
खुल्या बाजारात साखर 40 रुपये प्रती किलोंवर गेली असून सर्वसाधारण गरीब कुटुंबाच्या घरात गोडवा निर्माण व्हावा यासाठी शासन रेशन दुकानांद्वारे स्वस्त दरात साखर उपलब्ध करून देते परंतु तीन महिने उलटले तरी अंत्योदय योजनेच्या लाभार्थीना रेशनच्या दुकानांमधून साखर मिळालेली नाही. यामुळे लाभार्थींमधून प्रचंड नाराजीचा सूर आहे.

तालुक्यात 10 हजार साखरेचे लाभार्थी वंचित
रावेर तालुक्यात अंत्योदय रेशन कार्ड धारक 10 हजार 551 आहे. या सर्वांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची साखर मिळालेली नसल्याचे लाभार्थी सांगतात तर पुरवठा अधिकारी डी.के.पाटील यांनी साखर वाटप सुरू असल्याचा दावा केला आहे. याकडे वरीष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. अंत्योदय योजनेच्या लाभार्थीनी सुध्दा आपल्या संबधित रेशन दुकानदारांकडून तीन महिन्यांची साखर घेऊन जाण्याची गरज आहे.

गोदामात 292 क्विंटल साखर उपलब्ध
रावेर तालुक्याची 292 क्विंटल साखर केव्हाच उपलब्ध झाली आहे. यापैकी सावदा गोदामात 102 क्विंटल तर रावेर गोदामात 192 क्विंटल साखर शासनाकडून मिळाली आहे. रेशन दुकानांद्वारे साखरेचे वाटप सुरू असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक डी.के.पाटील यांनी दिली आहे.