रावेर । तालुक्यातील सात महसूल मंडळांमध्ये मार्च महिन्यात सलग पाच दिवस 40 अंशांपेक्षा जास्त तापमान होते. ही मंडळे विमा कंपनीने निर्धारित केलेल्या अतिउष्ण तापमानाच्या निकषात बसत असल्याचे विमा कंपनीने तालुका कृषी कार्यालयाकडे पाठवलेल्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
यामुळे शेतकर्यांना हेक्टरी 28 हजार 500 रुपये भरपाई मिळण्याची शक्यता आहे. विमा कंपनीने बसवलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रावर 25 मार्चनंतर सरासरी 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. सावदा, ऐनपूर, रावेर, खानापूर, खिर्डी, निंभोरा अशी ही मंडळे आहेत. कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी विमा कंपनीकडून हवामानाच्या नोंदी मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. या नोंदी विमा कंपनीने तालुका कृषी कार्यालयाकडे पाठवल्या आहे. त्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कमाल तापमान 40 अंशांपेक्षा जास्त असल्याने विमा योजनेत सहभागी शेतकर्यांना भरपाई मिळू शकते.