रावेर तालुक्यात अनेक जि.प.शाळांना कुलूप !
शिक्षकांच्या दुर्लक्षाने शिक्षणाचा बट्याबोळ : मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी घ्यावी दखल
रावेर (शालिक महाजन) : रावेर तालुक्यातील जिल्हा परीषद शाळेत ऑनलाईन शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा झाला असून अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांसह शिक्षकच येत नसल्याने शाळांना कुलूप कायम आहे त्यामुळे मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकारामुळे पालकवर्गातून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
शासन आदेशाला शिक्षकांकडून हरताळ
कोरोना काळात शिक्षकांनी शाळेवर उपस्थित राहून मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत मात्र या आदेशाला शिक्षक व मुख्याध्यापकांनी हरताळ फासली आहे. तालुक्यातील काही जिल्हा परीषद शाळांना जनशक्तीचे रावेर प्रतिनिधी शालिक महाजन यांनी बुधवार, 24 रोजी भेट दिली असता अनेक शाळांना कुलूप लावल्याचे दिसून आले. गलेलठ्ठ पगार घेणारे शिक्षक आपल्या खाजगी कामात व्यस्त होते. भावी पिढी घडवणारे शिक्षकच मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत नसल्याने गरीबांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे तरी कसे? असा प्रश्न सुज्ञ पालक उपस्थित होत आहे.
केंद्रप्रमुखांचे होतेय दुर्लक्ष
रावेर तालुक्यात 148 जिल्हा परीषदेच्या शाळा सून त्यापैकी एक शिक्षकी शाळा सात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष ठेवण्याचे काम 12 केंद्र प्रमुखांकडे आहे परंतु केंद्र प्रमुखांचेदेखील शाळेकडे दुर्लक्ष होत आहे. याचा फायदा शिक्षकासह मुख्यध्यापकांना होत असून ते शाळेवर येण्याची तसदी घेत नसल्याने दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शिक्षणापासून नुकसान होताना दिसून येत आहे. आधीच दोन वषार्ंपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने किमान ऑनलाईन शिक्षणावर मदार असताना आता हे शिक्षणदेखील मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
या जिल्हा परीषद शाळांना ‘कुलूप’
प्रस्तुत प्रतिनिधीने स्वतः केलेल्या पाहणीत रावेर तालुक्यातील अजंदे शाळेसह तामसवाडी, भोकरी, केर्हाळा, सहस्त्रलिंग, आभोडा शाळेला कुलूप दिसून आले तर तालुक्यातील अन्य शाळांचा अंदाज न लावलेलाच बरा, असे एकूण चित्र आहे. राज्य शासन करोडो रुपये जिल्हा परीषद शाळेच्या शिक्षकांच्या पगारावर खर्च करते परंतु याचा काहीही उपयोग गरीब मुलांना होतांना दिसून येत नाही.
गरीब कुटुंब वळताय खाजगी शाळांकडे
दरमहा चार ते पाच आकडी पगार घेणार्या शिक्षकांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याने गरीबाचे पाल्यही आता जि.प.शाळा नको म्हणू लागले असून या विद्यार्थ्यांचा आपसुकच कल आता खाजगी शाळांकडे वाढताना दिसून येत आहे. या प्रकाराला अर्थात शिक्षकांची ज्ञानार्जनाबाबतची अनास्था कारणीभूत आहे. गरीब कुटुंब काबाडकष्ट करून मुलांना मोठे पदावर पाहण्याचे स्वप्न पाहतात त्यात गैर काहीच नाही मात्र दांडी बहाद्दर शिक्षकांमुळे पालकांचे स्वप्नही धुळीत मिळते की काय? अशी स्थिती तालुक्यातील या शाळांचे चित्र पाहून उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.