रावेर : गत आठ दिवसांपासून मका खरेदी केंद्र बंद असल्याने तालुक्यातील शेतकर्यांवर कोरोना काळात संकट कोसळले आहे. आधीच दुष्काळात तेरावा महिना असतांना अचानक कोणतीही सूचना न देता खरेदी केंद्र बंद असल्यामुळे शेतकर्यांमधून संताप व्यक्त होत आहे. रावेर तालुक्याची आर्थिक उलाढाल ही शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असतांना शासनाकडून मका खरेदी केंद्र अचानक बंद केल्याने शेतकर्यांचे आर्थिक बजेट कोडमडले आहे. आधीच कोरोना संकट आणि त्यात मका खरेदी केंद्र बंद असल्याने मका पडून असल्याच्या भावना शेतकर्यांमधून उमटत आहे.
मका खरेदी आठ दिवसांपासून
शासनाने मक्याला एक हजार 760 रुपये भाव निश्चित केला असून 30 मे पासून मका खरेदी केंद्र सुरू झाले आहे. या दरम्यान 289 शेतकर्यांकडून तीन कोटी 33 लाख 57 हजारांचा 18 हजार 953 क्विंटलच मका शासनाकडून खरेदी झाला आहे. मागील आठ दिवसांपासून 14 जुलैपासून मका खरेदी केंद्र पूर्ण बंद करण्यात आले आहे.
केंद्र बंद अभावी 900 शेतकर्यांवर संकट
रावेर तालुक्यातील एकूण एक हजार 200 शेतकर्यांनी ऑनलाईन खरेदीसाठी नोंदणी केली हाती मात्र त्यापैकी फक्त 289 शेतकर्यांकडील मक्याची खरेदी होऊ शकली तर अजून 900 शेतकर्यांचा मका खरेदी करण्याचा बाकी आहे.
आठ दिवसात खरेदी केंद्र सुरू करा अन्यथा आंदोलन
आधीच कोरोनामुळे शेतकर्यांसह सर्वांचे कंबरडे मोडले असून ऑनलाईन नोंदणी केलेल्या सर्व शेतकर्यांचा मका खरेदी करा अन्यथा पुढच्या आठ दिवसात शासनाविरुध्द आंदोलन करण्याचा इशारा राजन लासुरकर यांनी दिला आहे.
शासनाकडून तात्पुरती खरेदी बंद
शासनाकडून आदेश आल्याने मका खरेदी केंद्र तात्पुरती बंद करण्यात आली आहे तसेच दिलेली मुदतदेखील संपली आहे. शासनाकडून पुढचा आदेश येईल तेव्हाच मका खरेदी पुन्हा सुरू करण्यात येईल, असे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले.