रावेर तालुक्यात ‘लेट्स रीड अ‍ॅण्ड राईट इंग्लिश’ उपक्रम

0

प्रायोगिक तत्वावर 10 शाळांचा सहभाग ; वर्षभरात सर्वच शाळांमध्ये उपक्रम

रावेर- पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे जिल्हा परीषद शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी ‘लेट्स रीड अ‍ॅण्ड राईट इंग्लिश’ (चला इंग्रजी वाचुया व लिहुया) या नाविण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी दिली. पुणे येथील सेंटर फॉर लर्निंग रीसोर्सेस (सीएलआर) या शैक्षणिक संशोधन क्षेत्रातील संस्थेच्या सहकार्याने रावेर तालुक्यातील 10 जिल्हा परीषद शाळेत हा कार्यक्रम इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे.

प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
शिक्षक विद्यार्थ्यांना दृक-श्राव्य पद्धतीने डी.व्ही.डी.द्वारे प्रोजेक्टरचा वापर करून अध्यापन करतील. त्यात इंग्रजी वाचन व लेखनाचे विशेष मार्गदर्शन करण्यात येईल. या उपक्रमासाठी जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन व पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, गटविकास अधिकारी हबीब तडवी मार्गदर्शन करीत आहेत.

दहा डिजिटल शाळांचा समावेश
तालुक्यातील 10 डिजिटल शाळांचा सुरुवातीला या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले असून शैक्षणिक वर्षात रावेर तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे. सहभागी शाळांमध्ये गाते जिल्हा परीषद शाळा, ऐनपूर जिल्हा परीषद मुलांची शाळा, तांदलवाडी कन्या शाळा, केर्‍हाळा जिल्हा परीषद शाळा क्रमांक दोन, रोझोदा जिल्हा परीषद शाळा, जिल्हा परीषद शाळा कुसुंबा, विवरे खुर्द जिल्हा परीषद शाळा, खिरोदा प्र.जिल्हा परीषद शाळा, खिरवड तसेच जिल्हा परीशद शाळेचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी नवाज तडवी काम पाहणार आहेत तसेच केंद्रप्रमुख यांनी या उपक्रमाची नियमित भेटी देवून अंमलबजावणी व्यवस्थित करावी, अशा सूचना गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी दिल्या आहेत.