चार लाख 63 हजार रोपांची होणार लागवड ; वनविभागासह सर्व विभाग सज्ज
रावेर- महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाकडून राबविण्यात येत असलेल्या वनमहोत्सवात मागील दोन वर्षाच्या लोकसहभागाच्या यशानंतर तृतीय वर्षात ‘एकच लक्ष 13 कोटी वृक्ष’ म्हणून रावेर तालुक्यात वृक्ष लागवडीसाठी तयारीला वेग आला आहे. 2016 मध्ये दोन लाख 16 हजार, सन 2017 मध्ये तीन लाख 55 हजार याप्रमाणे रोपांची लागवड करण्यात आली होती. अथक परीश्रमाने सर्वांच्या सहकार्याने हा टप्पा यशस्वीपणे पार पाडलल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांच्या संकल्पनेतून 1 ते 31 जुलै 2018 या महिन्यात संपूर्ण राज्यात 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे.
चार लाख 63 हजार वृक्ष लागवड होणार
उपवनसंरक्षक संजय दहिवले यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुक्यात चार लाख 63 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तालुक्यातील 95 ग्रामपंचायतींचा त्यात समावेश राहणार असून सर्व शासकीय कार्यालये सहभागी होणार आहेत. यापैकी सर्व ग्रा.पं.मिळून एक लाख चार हजार 500 वृक्ष लागवड होणार आहे. वनविभागाच्या पाल, सामाजिक वपीकरण विभाग (लालमाती) येथून रोपे उपलब्ध होणार असून इतर यंत्रणांना पाल व यावल येथील रोपवाटीकेतून 28 हजार 249 रोपे बंदपत्र भरून आपापल्या स्तरावरून नेता येतील. रावेर वनपरिक्षेत्र विभागाकडून वनविभागाच्या 14 ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे यात मंगरूळ, जुनोना, पाल, निमड्या, मोरव्हाल, सहस्त्रलिंग, लालमाती, लोहारा, कुसूंबा, या भागातील राखीव वनाच्या जागेवर करण्यात येणार आहे. रोपे वाहतूक व लागवडीबाबत काही तांत्रिक अडचणी आल्यास किंवा मार्गदर्शन लागणार असल्यास संबंधीत वन कर्मचार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन वनपाीक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी केले आहे.
वनमहोत्सवात सहभागाचे आवाहन
वृक्ष लागवडीसाठी वनविभागाचे 51 कर्मचारी, 11 सेवाभावी संस्था, सर्व स्थानिक शाळा, महसुल विभाग, गृहरक्षक दल, पोलीस विभाग, शासकीय दवाखाने, कृषी विभाग, यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठीत व्यापारी व डॉक्टर्स यांच्यासह सर्व सुजाण नागरीक वनमहोत्सवामध्ये सहभागी होऊन वृक्ष लागवड करण्यासाठी परीश्रम घेतील ही अभिमानाची बाब असल्याचे राणे यांनी सांगितले. यावेळी सामाजिक वनीकरण क्षेत्रपाल अरशद मुलांनी, गटशिक्षणाधिकारी विजय पवार, माऊली फाउंडेशनचे डॉ.संदीप पाटील, श्रीराम फाउंडेशनचे दीपक नगरे, वनपाल हरीश थोरात, अतुल तायडे, सविता वाघ, गजानन आढावणे, रवींद्र भामरे, शरद सोनवणे, ममता पाटील, प्रकाश सलगर, संजय भदाणे, यशवंत पाटील, संभाजी सूर्यवंशी, नीलम परदेशी, रोहिणी सोनार, सुपडू सपकाळे पत्रकार परीषदेत उपस्थित होते.