रावेर तालुक्यात वादळी पावसाने केळीला फटका ; घरांवरील पत्रे उडाली

रावेर : वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने रावेर तालुक्यातील केळील मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली असून वीज पुरवठा खंडित झाला आहे. केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चिंच फाट्याजवळ झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिले आहेत.

पुन्हा पावसाचा तडाखा
गुरुवारी तापी काठावरील निंभोरासीम, विटवा, निंबोल, ऐनपूर, धामोडी, खिर्डी, कांडवेल, सुलवाडी, वाघाडी, शिंगाडी या गावांना वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने तडाखा दिला. निंबोलसह परीसरा काही घरांवरील पत्रे उडाल्याची माहिती मिळाली आहे. झाडांच्या फांद्या तुटल्याने तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. ऐनपूर, निंबोल, निंभोरासीम, खिर्डी, वाघाडी, धामोडी, विटवा, शिंगाडी, नांदुरखेडा येथील केळी बागांना फटका बसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्याने भरपाईची मागणी होत आहे.