रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे 52 कोटींचे नुकसान
जनशक्तीच्या वृत्तानंतर प्रशासनातर्फे पंचनामे पूर्ण ; शेतकर्यांना मदतीची अपेक्षा
रावेर : रावेर तालुक्यात गत आठवड्यात झालेल्या वादळी पावसाने शेतकर्यांचे केळीचे सुमारे 52 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती शुक्रवारी प्रशासनातर्फे देण्यात आली. तसेच पंचनामेदेखील पूर्ण करण्यात आले आहेत. पंचमाने करण्यात ढिलाई होत असल्याचे वृत्त ‘जनशक्ती’ने प्रसिद्ध केल्यानंतर अखेर शुक्रवारी आठव्या दिवशी प्रशासनाने पंचमाने करण्याचे काम पूर्ण केले आहे. यात रावेर तालुक्यात आलेल्या वादळी पावसामुळे सुमारे 52 कोटी रुपयांचे केळीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून याची माहिती तालुका कृषी विभागातर्फे देण्यात आली.
सलग आठवडाभर वादळी पावसामुळे नुकसान
तालुक्यात 25 ते 30 मे दरम्यान वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात 25 मे रोजी तीन गावांमधील 46 शेतकर्यांचे 18 हेक्टरवर केळीच्या बागाचे 72 लाख 76 हजारांचे नुकसान झाले आहे तर 27 मे रोजी 23 गावांमधील एक हजार 611 शेतकर्यांचे एक हजार 164 हेक्टरवरील केळीच्या बागांचे 46 कोटी 56 लाख 88 हजार नुकसान, 29 मे रोजी 13 गावांमधील 114 शेतकर्यांचे 65 हेक्टर वरील केळीचे दोन कोटी 63 लाख 12 हजार नुकसान, 30 मे रोजी पाच गावांमधील 84 शेतकर्यांचे 36 हेक्टरवरील एक कोटी 43 लाख 12 हजारांचे नुकसान झाले आहे.