आमदार हरीभाऊ जावळे यांनी केली नुकसानग्रस्त बागांची पाहणी
रावेर- रावेर तालुक्यात गुरुवारी दुपारी वादळी वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रणरणत्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांना मोठा दिलासा मिळाला होता मात्र या वादळी वार्यामुळे तालुक्यातील विवरा बु.॥ सह रोझोदा व चिनावल येथील केळी उत्पादकांचे सुमार सात कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण केले जात आहेत. तालुक्यातील विवरा, रोझोदा, चिनावल, कुंभारखेडा, सावखेडा बु.॥ व खुर्द येथील 159 शेतकर्यांच्या 169 हेक्टरवरील केळीचे नुकसान होवून सहा कोटी 76 लाखांचे प्राथमिक नुकसान झाल्याची माहिती आहे. तहसीलदार उषाराणी देवगुणे व कृषी अधिकारी यांच्या सयुक्त विद्यमाने पंचनाम्याचे काम सुरू आहे.
आमदारांनी केली नुकसानीची पाहणी
गुरुवारी रावेरसह यावल भागात अवकाळी पावसासोबत वादळाने हजेरी लावल्याने केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. शुक्रवारी नुकसानग्रस्त केळीच्या बागांची आमदार हरीभाऊ जावळे यांनी भेट देऊन पाहणी केली. सहा गावातील 169 हेक्टरवरील केळीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे तर 159 शेतकरी नुकसानग्रस्त बाधीत झाल्याची माहिती आहे. आमदार हरीभाऊ जावळे यांनी तातडीने नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकार्यांना दिले. रोझोदा शिवारात नरेंद्र धांडे, रुपेश धांडे, भगवान सरोदे तर सावखेडा शिवारात राजेंद्र महाजन यांच्या शेतात आमदारांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ.मिलिंद वायकोळे, यशपाल धांडे, उपसरपंच दीपक धांडे, राजू महाजन आणि रोझोदा, सावखेडा ग्रामस्थ उपस्थित होते.