केळी उत्पादक संकटात ; लोकप्रतिनिधींसह शासनाची उदासीन भूमिका
रावेर (प्रतिनिधी)- देशात केळी उत्पादनासाठी प्रसिध्द असलेल्या रावेर तालुक्यात केळीवर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रार्दुर्भाव झाला आहे.तालुक्यातील शेकडो एकरावर केळीला करप्याची लागण झाल्याने तालुक्यात शेतकरी वर्गामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. केळी उत्पादक शेतकर्यांवर मोठी आपत्ती आली असून उपाययोजनांच्या बाबत लोकप्रतिनिधी, शासन व कृषी विभाग उदासीन असल्याने शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. करपा आटोक्यात आणण्यासाठी शासनाने युध्दपातळी वर मोहिम उघडण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
केळी उत्पादनात घट येणार
रावेर तालुका हा देशात केळीचे आगार म्हणून ओळखला जातो. तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड करण्यात आली आहे. सप्टेंबर, नोव्हेंबरपर्यंत केळीचे उत्पन्न येते मात्र त्यानंतर केळीवर हळूहळू करप्याचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. केळीची पाने पिवळसर दिसत असून काही ठिकाणी तर केळीची पाने अर्धी वाढली आहेत. तालुक्यातील उटखेडा, मुंजलवाडी, भातखेडा, तामसवाडी, रसलपुर, खिरवड आणि परीसरातील शेती शिवारातील हिरवीगार असलेले केळीचे पान पिवळे धमक दिसत आहे. करप्याच्या प्रादुर्भावामुळे केळीच्या उत्पादनात घट येणार आहे. करप्याच्या आपत्तीतून केळीला वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहे.
कृषी विभाग सुस्त, शेतकरी संतप्त
तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी कर्ज काढून पैसे उसनवार घेऊन महागडे केळीचे रोप (बिजवाई) घेऊन केळी लागवड केली आहे. त्यातच पाण्याची पातळी खाली जात असतांना अशा परिस्थितीत शेतकरी केळी जगविण्यासाठी रात्रं-दिवस परीश्रम घेत आहे. करप्याच्या आक्रमणामुळे शेतकरी खचला आहे त्यावर शासनस्तरावरील उपाय योजने संदर्भात लोकप्रतिनिधी व कृषी विभाग उदासीन असल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.