महसूल प्रशासनाकडून पंचनाम्यांना सुरुवात ; लोकप्रतिनिधींनी केली पाहणी
रावेर- रावेर शहर व तालुक्यात शुक्रवारी झालेल्या वादळी वार्यामुळे शेकडो हेक्टरवरील केळी आडवी झाल्यानंतर नुकसानीची पाहणी तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह अधिकार्यांनी केली तर पंचनाम्यांनादेखील सुरुवात झाली आहे. तालुक्यातील 16 गावांमधील 900 हेक्टरवरील 60 कोटी रुपयांचे केळीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती महसूल विभागातर्फे देण्यात आली. प्रशासनाने पंचनाम्याच्या सोपस्कारासोबतच तातडीने शेतकर्यांना भरपाई देण्यासाठी दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रावेर पूर्व भागात वादळी वार्यासोबत पावसामुळे हजारो हेक्टर केळी आडवी झाली होती. आधीच विविध संकटांनी घेरलेल्या शेतकर्यांवर अस्मानी संकट कोसळल्याने त्यांचे मनोबल खचले आहे. शनिवारी नुकसानग्रस्त भागाची महसूल विभागातर्फे पाहणी करण्यात आली.